ठाणे: कपडे सुकत घालण्याच्या वादातून 19 वर्षीय तरुणाने केली रुममेटची हत्या
Representative Image (Photo Credits: File Photo)

माणसाच्या मनात सूडबुद्धीची भावना निर्माण झाली की, माणूस काय करेल याचा काही नेम नाही.

अशीच सूडबुद्धीची भावना मनात ठेवून ओले कपडे सुकत घालण्याच्या शुल्लक वादातून 19 वर्षीय तरुणाने आपल्या रूममेटची हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात (Thane) घडली. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या वादातून आरोपी सुमन पासवान आणि विरुष पवार यांच्यात झालेल्या बाचाबाचीत विरुषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) वर्तविला आहे. यात पासवान याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

आरोपी सुमन पासवान आणि पीडित विरुष पवार हे दोघेही रूममेट म्हणून ठाण्यातील एका हॉटेलमध्ये राहत होते. याच हॉटेलमध्ये हे दोघे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. रविवारी रात्री त्या दोघांचे कपडे सुकत घालण्याच्या शुल्लक कारणावरुन वाद झाला. यात विरुषने आरोपी सुमनला त्याने वाळत घातलेले ओले कपडे काढण्यास सांगितले. मात्र पासवान ने काढण्यास नकार दिल्याने विरुषने त्याचे वाळत घातलेले ओले कपडे काढून त्याच्या सुक्या कपड्यांवर फेकून दिले. याचा सुमनला राग आला आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. हेही वाचा-

मुंबई: चारित्र्याच्या संशयावरुन माथेफिरु पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या

त्यानंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ज्यात पासवानने घरातील वस्तूंनी विरुषला मारण्यास सुरुवात केली. यात विरुषच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि जागेवर कोसळला. त्यानंतर हॉटेलमधील त्याच्या सहका-यांनी पोलिसांनी घडलेल्या घटनेची बातमी देताच भिवंडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विरुषला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच विरुषचा मृत्यू झाला.

विरुष आणि आरोपी सुमन पासवानमध्ये अनेकदा असे खटके उडायचे असे पोलिसांना चौकशीत आढळले. त्यामुळे सूडबुद्धीतून ही हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांना दाट संशय आहे.