कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे 108 रुग्णवाहिकेची सेवा थांबणार
Photo credit : toptamilnews

रुग्णांच्या सोयीसाठी राज्याच्या कोणत्याही भागात पोहोचणाऱ्या 108 रुग्णवाहिकेची सेवा आता थांबणार आहे. या रुग्णवाहिकेच्या सेवेत कार्यरत असणारे डॉक्टर, चालक, इतर कर्मचारी यांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे जोपर्यंत हा संप संपत नाही तोपर्यंत या रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेला हजर होणार नाही. राज्यामधील रुग्णवाहिकेची महत्वाची भूमिका पाहता या संपाच्या घोषणेमुळे साहजिकच राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे.

ही रुग्णवाहिकेची सेवा भारत विकास ग्रुपतर्फे चालवली जाते, मात्र गेल्या काही दिवसांपासून हा ग्रुप आणि डॉक्टर, चालक. कर्मचारी यांच्यामध्ये विविध मागण्यांसाठी धुसफूस चालू आहे. बाराऐवजी आठ तास काम, वेतनवाढ व वेतन करार, पीएफ, ईएसआयसी व सार्वजनिक सुट्या मिळाव्यात, अपघाती विमा व कौटुंबिक विमा मिळावा, कंपनीतील अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हर व डॉक्टरांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी अशा विविध मागण्या या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

या संपाबाबत औद्योगिक न्यायालय, आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, पोलीस अधीक्षक, सर्व महापालिका आयुक्त यांना 28 सप्टेंबरला पत्र पाठवून कळवल्याचं माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे अध्यक्ष समीर करबेले यांनी सांगितले आहे.

मात्र या संपाबाबत कोणतीही माहिती राज्य सरकारला नाही, त्यामुळे संप केल्यास कारवाई करू अशा इशारा आरोग्य संचालक संजीवकुमार कांबळे यांनी दिला आहे.