आता झाड पडून मृत्यू झाल्यास 1 लाख, तर जखमी झाल्यास 50 हजार नुकसानभरपाई; महानगरपालिकेचा नवा नियम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मान्सूनचे (Monsoon)अंदमान येथे आगमन झाले आहे, साधारण 12 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. पावसाळ्यात झाडांच्या पडझडीमुळे मुंबईमध्ये अनके अपघात होत राहतात. गेल्या काही वर्षांपासून झाड डोक्यावर पडून झालेल्या अपघातामुळे बरेच नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून यावेळी महापालिकने दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत नवीन नियम बनवले आहेत. तर आता झाड कोसळण्यामुळे मृत्यू झाल्यास ठेकेदारास मृताच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

आतापर्यंत झाड पडून जखम झाली, मृत्यू झाला तर कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नव्हती. मात्र आता नव्याने निघालेल्या निविदेत नुकसानभरपाईची नोंद केली आहे आहे. त्यानुसार झाड पडून जखम झाली तर 50 हजार नुकसान भरपाई दिली जाणार आहे. साधारण एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान धोकादायक झाडे पाडली जातात. यासाठी जून मध्यापासून नवीन ठेकेदार काम सुरु करणार आहेत. त्यानंतर झाड पडून अपघात झाला तर ते याची नुकसानभरपाई देतील. (हेही वाचा: मुंबईकरांचे आरोग्य पुन्हा धोक्यात; लिंबू सरबत, उसाचा रस यांमधील 81 टक्के बर्फ दुषित)

दरम्यान, या प्रस्तावाला अजून स्थायी समितीची मंजुरी मिळणे बाकी आहे. आचारसंहिता संपल्यावर हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल. धोकादायक झाड तोडीच्या कामासाठी महापालिका 2 वर्षांसाठी निविदा काढते. यावर्षी हे काम नवीन ठेकेदाराला दिले जाणार आहे, त्यामुळे झालेल्या अपघाताचे जबाबदारी त्याची असणार आहे.