Winter Health Tips: थंडी वाजणे आणि ताप येणे यांसारख्या आजारांवर उपयोगी ठरतील हे '5' घरगुती उपाय
Fever Representative Image (Photo credits: PixaBay)

थंडी सुरु झाली की नवनवीन आजारांचा ससेमिराही आपल्या पाठीशी लागतो. सर्दी-खोकला, थंडी, ताप (Fever) हे आजार थंडीत अगदी सर्रासपणे अनेकांमध्ये आढळून येतात. लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांनाच हे आजार होतात. वातावरणात गारवा निर्माण होऊन अचानक झालेल्या या बदलामुळे हे आजार उद्भवतात. यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे, ओषधोपचार करणे हे उपाय आपण करतोच पण थंडी, ताप हे वातावरणात होणा-या बदलांमुळे अचानकपणे उद्भवणारे आजार असल्यामुळे यावर त्वरित उपाय करणे गरजेचे आहे अन्यथा या आजारांचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

म्हणूनच अशा आजारांवर त्वरित घरच्या घरी उपाय करता यावे जेणे करुन या आजारांचा शरीरावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही म्हणून आज आम्ही तुम्हाला 5 घरगुती उपाय सांगणार आहोत.

1. मध आणि लिंबाचा रस

लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करते. मध आपल्या शरीराला पोषण देते. ताप कमी करण्यात दोघांचे मिश्रण प्रभावी आहे. आपण लिंबू रस 1 टेबल स्पून आणि मध 1 टेबल स्पून असे मिश्रण करा. चांगले मिक्स करा आणि आपल्या बाळाला द्या. त्याचा ताप निश्चितपणे कमी होईल. थंडीच्या दिवसात भरपूर गाजर खा, आरोग्यासह सौंदर्यासाठी सुद्धा ठरेल फायेशीर

2. कांदे

जर आपण भारतीय असाल तर आपल्या आई किंवा आजीने कांद्याच्या औषधी गुणांविषयी आपल्याला सांगितलेच असेल. कांदा शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो तसेच त्यामुळे वेदनाही कमी होतात. यासाठी फक्त अख्ख्या कांद्याचे बारीक तुकडे करावेत आणि काही मिनिटे ताप आलेल्या माणसांच्या पायांवर 2 ते 3 तुकडे घालावेत. ताप कमी करण्यासाठी ही प्रक्रिया दिवसातून दोनदा केली जाऊ शकते.

3. अंड्याचे पांढरे बलक

अंड्याच्या पांढऱ्या भागाचे ३ चमचे घ्या आणि एका लहान बाऊल मध्ये चांगले फेटून घ्या. त्यात कापडाचा एक स्वच्छ तुकडा थोडावेळ भिजवून घ्या. नंतर ते कापड ताप आलेल्या व्यक्तीच्या पायावर घाला आणि एका तासासाठी ते तसेच ठेवा. शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होईल.

हेदेखील वाचा- किवी फळ खाण्याचे फायदे जाणून घ्या!

4. मनुके

अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे मनुकांमुळे प्रभावीपणे ताप कमी होतो. आपण अर्धा कप पाण्यात साधारण 25 मनुका एक तासासाठी भिजत घालू शकता. मनुका मऊ झाल्या की थोड्या क्रश करून घ्या, पाणी काढून टाका. अर्ध्या लिंबाचा रस त्यात घाला, आणि हे मिश्रण दिवसातून दोन वेळा द्या. असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.

5. तांदळाची पेज

शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत करण्यास मदत करते. हे लघवीचे प्रमाण वाढवते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. विषाणूजन्य ताप प्रभावीपणे कमी करण्यासाठी आपण तांदळाच्या पेजेचा वापर करू शकता.

हे झटपट घरगुती उपाय केल्यास ताप पुर्ण शरीरात पसरणार नाही. यात ताप डोक्यापर्यंत पोहोचू न देणे ही एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. हे उपाय करुनही जर ताप नियंत्रणात येत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)