Covid-19 XE Variant in India: देशात पहिल्या कोरोनाच्या 'एक्सई व्हेरिएंट'ची पुष्टी; BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य
आता INSACOG च्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये XE प्रकाराची पुष्टी अशा वेळी आली आहे जेव्हा 12 राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून, मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु त्याचा धोका अद्याप संपलेला नाही. तज्ञ लोक जनतेला कोविड-19 च्या चौथ्या लाटेबद्दल सावध करत आहेत. दरम्यान, आता कोरोना विषाणूच्या सर्वात वेगाने पसरणाऱ्या एक्सई व्हेरियंटने (XE Varient) चिंता वाढवली आहे. हा प्रकार कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा 10 पट वेगाने पसरत आहे. ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट XE च्या देशातील पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. भारतीय SARS-CoV2 जीनोमिक्स सीक्वेंसिंग कंसोर्टियम (INSACOG) द्वारे या रुग्णाची पुष्टी झाली आहे.
INSACOG हे सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे. एक्सई सब-व्हेरियंटचा संसर्ग इतर ओमिक्रॉन सब-व्हेरियंट्समुळे होणाऱ्या संसर्गापेक्षा वेगळा असल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत मिळालेला नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. The Indian Express मधील एका अहवालानुसार, XE सब-व्हेरियंट हा Omicron च्या सध्याच्या BA.2 प्रकारापेक्षा 10 टक्के अधिक संक्रमणक्षम असल्याचे आढळून आले आहे, ज्याने जानेवारीमध्ये देशात तिसरी कोविड लाट सुरू केली.
आतापर्यंत देशात कोरोना विषाणूचे अनेक रीकॉम्बिनंट प्रकार आढळून आले आहेत. हे सर्व भौगोलिकदृष्ट्या भिन्न प्रदेशातील आहेत, यामुळे क्लस्टर तयार होत नाही. XE प्रकाराचा नमुना कोठून प्राप्त झाला याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. याआधी महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही XE प्रकाराच्या संसर्गाच्या 2 प्रकरणांची नोंद झाल्याची बातमी आली होती. मात्र तपासात ते XE प्रकार नसल्याचे दिसून आले होते. (हेही वाचा: भारतात आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा उद्रेक; त्रिपुरामध्ये 100 हून अधिक डुकरांचा मृत्यू)
आता INSACOG च्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये XE प्रकाराची पुष्टी अशा वेळी आली आहे जेव्हा 12 राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून, मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. INSACOG बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, 'ओमिक्रॉन (BA.2) हा भारतातील आतापर्यंतचे कोरोना विषाणूचे सर्वात प्रमुख स्वरूप आहे. XE प्रकार हा 'रीकॉम्बिनंट' आहे. याचा अर्थ असा की त्यात BA.1 तसेच Omicron च्या BA.2 प्रकारात सापडलेल्या म्युटेशन्सचा समावेश आहे. जानेवारीमध्ये पहिल्यांदा यूकेमध्ये हा प्रकार आढळून आला होता.