मुंबईत या '6' ठिकाणी मिळणारी चविष्ट मिसळ, चाखायलाच हवी !
जगातील रूचकर शाकाहारी पदार्थ म्हणून निवड झालेली ठसकेबाज मिसळ तुम्ही चाखलीय का?
मुंबईतील स्ट्रीट फूडसमध्ये मिसळ हा पदार्थ लोकप्रिय आहे. महाराष्ट्रभरात विविध स्टाईलने मिसळ बनवली जाते. प्रत्येक शहरानुसार मिसळमधील घटक बदलतात. अगदी मसालेदार, झणझणीत मिसळीपासून उपवासाच्या खास मिसळीपर्यंत अनेक प्रकारामध्ये मिसळ उपलब्ध असते.
घरच्या घरीदेखील झटपट आणि चटकदार मिसळ बनवता येऊ शकतो. पण मुंबईत तुम्ही फेरफटका मारत असाल तर या ठिकाणी प्रत्येक 'मिसळप्रेमी' अवश्य थांबून त्याची चाखतोच... मग तुम्हीही 'या' ठिकाणी मिसळ चाखली नसेल तर या विकेंडला नक्की प्लॅन बनवाच ...
1) आस्वाद मिसळ
जगातील रूचकर शाकाहारी पदार्थ म्हणून दादरच्या आस्वाद हॉटेलमधील ठसकेबाज मिसळीची निवड झाली आहे. मोड आलेल्या मटकीचा या मिसळीमध्ये समावेश असतो. सोबत तुम्हांला गरजेनुसार अनलिमिडेट तर्री आस्वादमध्ये मिळते.
कुठे आहे ?
पूर्वी शिवसेनाभवनाजवळ असलेले आस्वाद हॉटेल काही महिन्यांपूर्वी अमर हिंद मंडळ समोर, दादर गोखले रोड येथे शिफ्ट करण्यात आलं आहे.
2) मामलेदार मिसळ, ठाणे
मामलेदार मिसळ ही ठाण्याची जणू ओळखच आहे. तुम्ही ठाण्यात असाल तर मामलेदारची झणझणीत मिसळ चाखायला मूळीच विसरू नका. या ठिकाणी गर्दीअसल्याने थोडा काढूनच मिसळ खायला जा.
कुठे आहे ?
जिल्हा परिषद ऑफिससमोर, तलावपाळी ठाणे पश्चिम
3) पणशीकर उपहारगृह
दादर, गिरगाव या भागात पणशीकर उपहार केंद्र हमखास आढळतात. रूचकर, झणझणीत चवीची मिसळ चाखायची असेल तर पणशीकर उपहार केंद्राला नक्की भेट द्या. पणशीकरांकडे पुणेरी मिसळ, मिसळपाव यांच्यासोबतीने उपवासाची स्पेशल मिसळही मिळते. मसालेदार मिसळीमध्ये पोह्यांचा बेस असतो. त्यामुळे विविध चवीच्या मिसळीचा आनंद लुटायचा असेल तर पणशीकरांच्या उपहार केंद्राला नक्की भेट द्या.
कुठे आहे ?
दादर रेल्वेस्थानकासमोर, दादर पश्चिम
4) प्रकाश उपहारगृह
दादरच्या प्रकाश उपहार केंद्रामध्येही मसालेदार आणि उपवसाची अशी दोन प्रकारची मिसळ मिळते. मात्र प्रकाशच्या मिसळीसोबत पाव दिला जात नाही. त्यामुळे केवळ मिसळवर ताव मारायचा असेल तर प्रकाशला नक्की भेट द्या
कुठे आहे ?
दादर, गिरगाव
5) विनय
गिरगावमध्ये मराठमोळी वस्ती असल्याने महाराष्ट्रातले अस्सल चवीचे अनेक पदार्थ गिरगावच्या हॉटेल्समध्ये हमखास चाखायला मिळतात. अशापैकी एक म्हणजे गिरगावातील विनय हॉटेल. चर्नीरोड, गिरगाव भागात असाल तर विनयची मिसळ चाखायला नक्की या. इथे पाच वेगवेगळ्या चवीची मिसळ मिळते.
कुठे आहे ?
जवार मॅन्शन, डॉ. बी.ए.जायकर मार्ग, गिरगाव
6) लाडू सम्राट
लालबागमधील लाडू सम्राटमध्ये अस्सल मराठमोळे अनेक पदार्थ चाखायला मिळतात. लाडू ही इतकीच लाडू सम्राटची ओळख नाही. तर लाडू सम्राटमध्ये थालीपीठ आणि मिसळही उत्तम मिळते.
कुठे आहे ?
लालबाग मसालागल्ली जवळ, करी रोड स्टेशनवरून चालत तुम्ही लाडू सम्राटमध्ये जाऊ शकता.