Shiv Jayanti 2026 Famous Slogans: छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसिद्ध घोषवाक्ये आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवमय झाला आहे. या लेखात शिवजयंतीनिमित्त वापरली जाणारी प्रमुख घोषवाक्ये, शिवगर्जना आणि त्यामागील अर्थाचा आढावा घेण्यात आला आहे.

शिवजयंतीचे घोषवाक्य मराठीत

मुंबई: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) आज, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यापासून ते गावागावातील चौकांपर्यंत शिवरायांच्या नावाचा जयघोष ऐकू येत आहे. शिवजयंतीच्या मिरवणुकांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये विविध घोषवाक्ये (Slogans) वापरली जातात, जी शिवभक्तांमध्ये शौर्य आणि स्वाभिमानाची ऊर्जा निर्माण करतात.

प्रमुख घोषवाक्य: 'जय भवानी, जय शिवाजी'

शिवजयंतीच्या उत्सवात सर्वात जास्त उमटणारा आवाज म्हणजे 'जय भवानी, जय शिवाजी'. हे घोषवाक्य केवळ एक नारा नसून ते स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे परम भक्त होते आणि आई भवानीच्या आशीर्वादाने त्यांनी स्वराज्य स्थापन केले, या श्रद्धेतून हे घोषवाक्य रूढ झाले आहे. आजच्या काळात कोणत्याही शिवप्रेमी कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता या घोषणेशिवाय पूर्ण होत नाही.

'निश्चयाचा महामेरू' आणि शिवगर्जना

शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या सन्मानार्थ जी 'गारद' किंवा 'शिवगर्जना' दिली जाते, ती अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचे केलेले वर्णन प्रामुख्याने वापरले जाते:

"निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।"

याशिवाय, "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!" ही संपूर्ण घोषणा शिवजयंतीच्या सोहळ्याची शान वाढवते.

स्वराज्याचा महामंत्र: 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे...'

महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिलेला "हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हीच श्रींची इच्छा!" हा संदेश आजही शिवजयंतीचे मुख्य ब्रीदवाक्य मानले जाते. यातून महाराजांची नम्रता आणि रयतेचे राज्य निर्माण करण्याची त्यांची दूरदृष्टी दिसून येते. तसेच, "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता..." हा त्यांच्या राजमुद्रेवरील श्लोक आजही स्वराज्याचे अधिकृत घोषवाक्य म्हणून आदराने उच्चारला जातो.

डिजिटल युगात शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना काही नवीन आणि प्रभावी घोषवाक्ये वापरली जात आहेत:

"नसानसात शिवराय, रक्तात फक्त स्वराज्य."

"जाणता राजा: रयतेचा राजा, माझा राजा."

"एकच राजा इथे जन्मला, शिवनेरीच्या किल्ल्यावर."

शिवजयंती हा केवळ एक सण नसून तो महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचा दिवस आहे. या घोषवाक्यांच्या माध्यमातून त्यांची शिकवण आणि शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवभक्त करत आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement