350th Shivrajyabhishek Sohala: यंदा 1 आणि 2 जून 2023 रोजी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा; विविध कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या कशी असेल तयारी

सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्र शासन 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा 1 आणि 2 जून 2023 रोजी रायगडावर साजरा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यानिमित्ताने सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले.

सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्तावित केल्यानुसार भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी दिल्ली, दमण दिव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्त्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. (हेही वाचा: यंदा 1 मे रोजी सकाळी 8 वाजता होणार ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ; सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्वे)

सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार आहे त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सोहळ्याच्या समग्र नियोजनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गडावर संबंधित लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.