जगातील सर्वात वेगाने विकास होणाऱ्या शहरांमध्ये सुरत ठरले अव्वल; पहिली 17 शहरे भारतातील
सुरत (Photo credit : CityTadka)

उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील भारताची कामगिरी ही समाधानकारक ठरत आहे. ही कामगिरी अशीच राहिली तर भारत लवकरच चीनलाही मागे टाकेल असे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स (Oxford Economics) ने पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार पुढच्या 20 वर्षांमध्ये जगातील सर्वात वेगाने विकास होणाऱ्या शहरांमधील तब्बल 17 शहरे ही भारतातील असणार आहेत. या अहवालानुसार 9.17 इतक्या अपेक्षित विकास दराने गुजरात राज्यातील सुरत हे शहर सर्वात वेगाने वाढणारे शहर ठरणार आहे.   2019 ते 2035 या कालावधीमधील ही संभाव्य आकडेवारी आहे.

या अहवालात सुरतनंतर आग्रा, बंगळुरू आणि  हैदराबाद या शहरांचा नंबर लागतो, ज्यांचा अपेक्षित विकास दर हा 8.58 इतका असणार आहे. त्यानंतर नागपूर, त्रिपुरा, राजकोट, त्रिची, चेन्नई आणि विजयवाडा अशी टॉप 10 शहरे असणार आहेत. भारताबाहेर नोम पेन्ह (Phnom Penh) तसेच आफ्रिकेतील दार अस सलाम (Dar es Salaam) ही शहरे वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आघाडीवर असतील.

सूरत हे सध्या हिरा उद्योगाचे मुख्य केंद्र असून भविष्यात आयटी उद्योगही येथे स्थिरावेल. त्याचप्रमाणे भविष्यात इतर उद्योगधंद्यांसाठीचेही सुरत एक महत्वाचे केंद्र बनेल. सध्या बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे टेक्नोलॉजी उद्यगासाठी ओळखली जातात तसेच या शहरांमध्ये वित्तीय सेवा देणाऱ्या अनेक कंपन्याही आहेत.

लोकसंख्येचा विचार केला तर 2035 पर्यंत पहिल्या दहा शहरात मुंबईचा समावेश असणार नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून 2035 मध्ये न्यूयॉर्क प्रथम क्रमांकावर असेल तर त्यापाठोपाठ टोकियो, लॉस एंजेलिस, शांघाय आणि लंडन या शहरांचा क्रमांक असेल.