विराट कोहली बनला सुपरहिरो; प्रदर्शित केला आपल्या नव्या प्रोजेक्टचा ‘ट्रेलर व्हिडीओ’
विराट कोहली (Photo Credits: Youtube)

विराट कोहलीबाबत काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती, विराट एका नव्या चित्रपटामार्फत आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात होते. विराटने अशा आशयाचे एक ट्वीट देखील केले होते. मात्र आता या गोष्टीमधील तथ्य समोर आले आहे. विराट कोणत्याही चित्रपटात भूमिका करत नसून तो एका गारमेंट ब्रँडचा प्रचार करत आहे. याच्याच प्रचाराचा एक भाग म्हणून विराटचे विविध पोस्टर्स सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आले होते. ज्यामध्ये असे सांगितले होते की विराट ‘ट्रेलर: द मूव्ही’मध्ये दिसणार आहे.

नुकताच विराटच्या या फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये विराट Wrogn या ब्रँडचा प्रचार करताना दिसून येत आहे. या ट्रेलरमध्ये विराटला एका अॅक्शन हिरोच्या रुपात दाखवले गेले आहे, जो विनाशापासून या जगाचे संरक्षण करतो.

हा ट्रेलर अतिशय मजेशीर असून, या ट्रेलरमुळे विराटच्या चाहत्यांमध्ये त्याला खरोखरच चित्रपटामध्ये पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. विराट यापूर्वी अनेक जाहिरातींमध्ये दिसून आला आहे. एक क्रिकेटर असून विराट कॅमेराच्या समोर अतिशय आत्मविश्वासाने वावरतो. या ट्रेलरमध्येही विराटच्या अभिनयाची चुणूक दिसून येते. त्यामुळे येत्या काही वर्षांत विराट कोणत्या चित्रपटात दिसला तर त्यात नवल नसावे.