मोठी कामगिरी: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक; 15 वर्षांपासून होता फरार
रवी पुजारी (Photo Credit: YouTube Screengrab)

कुख्यात गुंड, गँगस्टर रवी पुजारी (Ravi Pujari) ला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल (Senegal) देशातून रवी पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 90 च्या दशकात अधिक सक्रीय असणारा हा डॉन, गेली 15 वर्षे भारताबाहेर असल्याने त्याला पकडणे अवघड ठरले होते. रवी पुजारीवर अनेक देशांमध्ये खंडणी आणि खुनाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. बंगळुरु पोलिसांनी रवी पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 2011 ते 2017 या काळात त्याने अनेक सेलिब्रिटींना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. यामध्ये सचिन तेंडुलकर, प्रिती झिंटा, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे.

रवी पुजारीला 22 जानेवारीला अटक करण्यात आली, त्यानंतर 26 जानेवारीला भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली. अटकेनंतर पुजारी याला भारतात आणले जाईल असे समजते. भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत रवी पुजारीवर लक्ष ठेवून होत्या. तो सेनेगलमध्ये असल्याचे समजण्यापूर्वी तो पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. (हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू रॉजर स्टोन यांना खोटारडेपणाच्या आरोपाखाली अटक)

रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केले असून, दोन दशकांपूर्वी त्याने स्वत:ची वेगळी टोळी तयार केली होती. मागील पंधरा वर्षांत रवी पुजारीविरोधात अनेक देशांमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. यापूर्वी तो ऑस्ट्रेलियात लपला असल्याची शक्यता वर्तवली जात होती.