भर दिवसा 50 माओवाद्यांकडून गोळ्या झाडून 2 आमदारांची हत्या
किदारी सर्वेश्वरराव आणि सिवेरी सोमा

आंध्रप्रदेशमध्ये माओवाद्यांनी अराकु येथील तेलुगु देशम पक्षाचे (टीडीपी) आमदार किदारी सर्वेश्वरराव आणि माजी आमदार सिवेरी सोमा, तसेच त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोघांची हत्या केली आहे. सध्याचे आमदार व माजी आमदार विशाखापट्टणम जिल्ह्याच्या जनसंपर्क दौ-यावर असताना कार्यकर्त्यांसमोर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना मारण्यासाठी तब्बल 50 माओवादी त्या ठिकाणी उपस्थित होते.

दंबारीकुडा परिसात जनसंपर्क कार्यक्रमासाठी हे आमदार गेले असताना, 50 माओवाद्यांनी या आमदारांचा ताफा अडवून कार्यकर्त्यांना बंदुकीचा धाक दाखवून लांब पाठवले आणि नंतर या आजी व माजी आमदारांवर गोळ्या झाडल्या. घटनास्थळीच या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण आंध्रप्रदेश हादरून गेला आहे.

आंध्रप्रदेशमध्ये होणाऱ्या बॉक्साईडच्या खाण्यांच्या उत्खननाला या माओवाद्यांचा विरोध होता. त्यामुळे या सगळ्याचा बदला घेण्यासाठी या दोन आमदारांवर भर रस्त्यात मारण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर आता नेमकं काय घडलं याचा पोलीस तपास करत आहेत. भर दिवसा, भर चौकात अशा प्रकारे गोळी झाडून मारल्याचे प्रकाराने संपूर्ण परिसरात भीतीची लाट पसरली आहे.