Swami Vivekananda Jayanti 2019 : स्वामी विवेकानंद यांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण
स्वामी विवेकानंद उंच पुतळा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

रांची : 12 जानेवारी, 1863 स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचा जन्मदिवस. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिन (Yuva Din) म्हणून साजरा केला जातो. 1984 मध्ये भारत सरकारने जाहीर केल होते की, विवेकानंदांचे विचार हे युवकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहेत, तेव्हापासून हा दिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवसाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद यांच्या भारतातीत सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण झाले.  झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास (Raghubar Das) यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा ब्राँझ धातूचा असून त्याची उंची 33 फुट आहे,

ही मूर्ती तलावाच्यामध्ये स्थित आहे. मूर्तीजवळ जाण्यासाठी बोटींची व्यवस्था केली आहे. 2016 मध्ये नागपूर येथे स्वामीजींची 22 फुट उंचीची मूर्ती बसवण्यात आली होती. आज अनावरण झालेली ही मूर्ती सर्वात उंच ठरली आहे. ही मूर्ती उभारण्यासाठी एकूण खर्च 17 करोड इतका आला आहे. पुतळ्याचे जवळजवळ संपूर्ण काम झाले आहे, मात्र तलावाच्या समोरील आणि पुतळ्याजवळ पोहचण्याऱ्या रस्त्याचे काम अजून थोडे बाकी आहे, ते एका महिन्यात पूर्ण होईल अशी अशा आहे.

दरम्यान, उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 साली (संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. त्याद्वारे त्यांनी लोकांची सेवा केली. पुढे रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकाता येथे केली. शुक्रवार, जुलै 4, 1902 ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.