Monsoon Session of Parliament 2021: राज्यसभेत नुकत्या घडलेल्या धक्काबुक्कीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच संसदेत घालण्यात येणाऱ्या गोंधळाविषयी उलटसुटल प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही यासंदर्भात आवाज उठवला आहे. काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नुकताच रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, संसदेत काँग्रेस आणि सीपीआयच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळावर त्यांनी भाष्य केले आहे. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले आहे. तसेच पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी संसदेत दंगा घालण्याचे काम केले. विरोधी पक्षाचे सदस्य सतत सभागृहाच्या वेलमध्ये येत होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. हे देखील वाचा- Cryptocurrency Exchange: क्रिप्टोकरन्सी बदलण्यात भारतीय महिला आघाडीवर, छोट्या शहरांमध्ये संख्या अधिक- रिपोर्ट
राज्यसभेत झालेल्या अभुतपूर्व गदारोळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी हे आरोप फेटाळून लावत आहेत. तसेच विरोधी पक्षातील खासदारांकडून मार्शल्सना मारहाण झाली आहे, असाही दावा सत्ताधारी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी केंद्र सरकारने अहवाल सादर केला आहे. ज्यात सीपीआयचे खासदार इलामारम करीम यांनी पुरुष मार्शलचा गळा दाबत मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर, काँग्रेसच्या खासदार फुलो देवी नेताम आणि छाया वर्मा यांनी महिला मार्शलला ओढत नेले. तसेच त्यांना मारहाण केल्याचे अहवालात सांगितल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.