स्वयंघोषित संत 'बाबा रामपाल'ला सुप्रीम कोर्टाचा दणका; हत्याकांड प्रकरणात ठरवले दोषी
बाबा रामपाल (Photo Credits: PTI)

सतलोक आश्रमातील दोन हत्याकांड आणि षडयंत्र याबाबत आश्रमाचे प्रमुख आणि स्वयंघोषित संत बाबा रामपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी येत्या 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तसेच बाबा रामपाल यांच्यावर असलेल्या देशद्रोहाच्या आरोपाबाबत 19 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. संत रामपालच्या सुरक्षिततेचा विचार करून ही संपूर्ण सुनावणी कारागृहातच पार पडली.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसारमध्ये हिंसाचाराच्या घटना घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनानं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. सुनावणी सुरु असताना न्यायालयाच्या आवारातील 3 किलोमीटरपर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

14 नोव्हेंबर 2014 साली, जेव्हा आश्रमात झालेल्या नरबळी प्रकरणी रामपाल यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यावेळी ते हजर राहिले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आश्रमातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या दरम्यान रामपाल याचे समर्थक आणि पोलिसांत धुमश्चक्री होऊन हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात सहा महिला आणि एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. रामपालवर अजूनही 3 केसेस चालू आहेत, यापैकी 2 हत्येच्या आणि एक देशद्रोहाची आहे.