RBI ने सलग चौथ्यांदा केली रेपो दरात कपात; आता कर्ज घेणे झाले अजून सोपे, जाणून घ्या नवीन दर
होम लोन (Photo Credits: Twitter)

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने बुधवारी सलग चौथ्यांदा रेपो दरात (Repo Rate) 0.35 टक्क्यांनी कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांकडून कर्ज घेणे आता स्वस्त होणार आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. केंद्रीय बँकेने चलनविषयक धोरणातील आढावामध्ये रेपो दरात 0.35 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत आता आरबीआय बँकांना 5.40 टक्के दराने कर्ज देईल. या कपातीनंतर सध्याचा रेपो रेट हा 9 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे.

याशिवाय रिझर्व्ह बॅंकेने रिव्हर्स रेपो दरही 5.15 टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी आरबीआयने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनच्या पॉलिसी मध्येही रेपो दरात तीनदा कपात केली होती. महागाई कमी झाल्यामुळे अर्थतज्ञांनी आधीच व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात होण्याची अपेक्षा केली होती. असे म्हटले जात आहे की, आर्थिक कामांना चालना देण्यासाठी आरबीआयने या वेळीदेखील रेपो दर कमी केला आहे. (हेही वाचा: RBI च्या सत्तत नोटांची व नाण्यांची वैशिष्ट्ये, आकार बदलण्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह; सहा आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश)

आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. त्यानंतर बँका या कर्जाने त्यांच्या ग्राहकांना पुढे कर्ज देतात. म्हणूनच, आता रेपो दरात घट झाल्यामुळे सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील अशी अपेक्षा आहे. रिव्हर्स रेपो दर हा दर म्हणजे, आरबीआय बँकांना त्यांच्या जमा केलेल्या पैशांवर व्याज देते तो दर होय. बाजारात अधिक रोख रक्कम आल्यास आरबीआय रिव्हर्स रेपो दर वाढवते. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांच्या अध्यक्षतेखाली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची The Monetary Policy Committee) 3 दिवसांची बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.