राफेल वाद: CBI मुख्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन; राहुल गांधींना अटक, लगेचच सुटका
सीबीआय मुख्यालयाबाहेरुन राहुल गांधींना अटक (Image credit: ANI)

केंद्रीय अन्वेशन ब्युरो (सीबीआय) मध्ये सुरु असलेल्या वादाला थेट राफेल डीलशी जोडत राष्ट्रीय काँग्रेसने आक्रमक भूमीका घेतली आहे. अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आज सीबीआयच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. या वेळी राहुल गांधी यांचा कधीच न पाहिलेला अंदाज काँग्रेस कार्यकर्ते, मीडिया आणि देशाला पाहायला मिळाला. दरम्यान, राहुल गांधी यांनी राफेल आणि सीबीआय प्रमुखांमध्ये सरकारने केलेला बदल यावरुन सरकारविरोधात आंदोलन करत स्वत:ला प्रतिकात्मकरित्या अटक करुन घेतले. त्यानंतर अलपावधीतच त्यांची सुटकाही झाली.

सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु आहे. त्यातून सरकारने सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांना अचानकपणे दीर्घ सुट्टीवर पाठवले. त्यावरुन राफेल प्रकरणाची चौकशी दाबण्यासाठीच सरकारने सीबीआय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच, त्यांना सुट्टीवर पाठवले आहे, असा आरोप करत काँग्रेसने हे आंदोलन केले. काँग्रेसने हे आंदोलन देशभरातील सीबीआय कार्यालयांमसोर केले. राहुल गांधींनी हे आंदोलन राजधानी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयासमोर केले. राहुल यांनी आंदोलनाची सुरुवात दिल्लीतील लोधी रोडवरील दयाल सिंह कॉलेजसमोरील मैदानापासून पदयात्रेने केली. दरम्यान, काँग्रेस आंदोलक जेव्हा सीबीआय मुख्यालयासमोर पोहोचले तेव्हा, पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेट्सचा त्यांना समाना करावा लागला. दरम्यान, स्वत:राहुल गांधी अनेक कार्यकर्त्यांसोबत बॅरिकेट्सवर चढले आणि केंद्र सरकार विरोधात घोषणा देऊ लागले.

दरम्यान, बॅरिकेट्सवरुन उतरल्यावर राहुल गांधी वाहनावर चढून बसले.  पोलीस प्रशासनाने बराच काळ समजूत काढल्यावर राहुल गांधी खाली उतरले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला पोलिसांकरवी प्रतिकात्मकपणे अटक करवून घेतले. प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसने पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये सीबीआय कार्यालयांपूढे आंदोलन केले.