अन्वर यांचा राजीनामा राष्ट्रवादीसाठी अत्यंत धक्कादायक तसेच, अस्वस्थ करणारा: प्रफुल्ल पटेल
(Photo Credit: ANI )

'पक्षाचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडणे हे, आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि तितकेच आश्चर्यकारक आहे. त्यांनी ज्या कारणावरुन पक्ष सोडला त्या 'राफेल'च्या विषयावर पक्षाची भूमीका ठरवण्यात त्यांचा सहभाग होता. राफेलच्या मुद्द्यावरून भूमिका ठरवताना शरद पवार यांच्यासोबत तेही चर्चेला उपस्थित होते', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तारीक अन्वर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यावर पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असलेले खासदार तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी पक्षातील सर्व पदांचा आणि आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी आज (शुक्रवार, 28 सप्टेंबर) राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरुन सोनिया गांधी यांच्याशी मतभेद झाल्यावर शरद पवार, दिवंगत पी. ए संगमा आणि तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. विशेष असे की, पक्ष स्थापन केल्यावर अवघ्या सहाच महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात काँग्रेससोबत आघाडी करुन सत्ता मिळवली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया महाराष्ट्र असला तरी, तो राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असला तरी, दिवंगत पी. ए. संगमा आणि तारीख अन्वर हे चेहरे राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय चेहरा आणि ओळख मिळवून देत असत. त्यापैकी दिवंगत पी. ए. संगमा यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. पुढे त्यांनी स्वत: राजकीय पक्ष काढला. त्यामुळे आता तारीक अन्वर शरद पवार यांच्यासोबत होते. मात्र, आता त्यांनीही आपल्या पदांचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय भविष्य कसे असेल हे येणारा काळच सांगणार आहे.