लोकसभा निवडणूक 2019: आगोदर मतदान मगच उमेदवारी, अजित पवार यांच्याकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीसाठी हटके फंडा
राष्ट्रवादीतही हा प्रश्न डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे जागा एक इच्छुक अनेक अशा स्थितीत नेमक्या उमेदवारीसाठी काय मार्ग काढावा या विवंचनेत पक्षनेतृत्व असताना अजित पवार यांनी हा प्रश्न जाहीर मतदानाद्वारे सोडवला.
Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. डॉ. कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हटके फंडा वापरला. डॉ. कोल्हे यांना उमेदवारी तर मिळाली. या उमेदवारीनंतर शिवसेना (Shiv Sena) खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (MP Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रभावाखाली असलेला शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency) डॉ. कोल्हे राष्ट्रवादीकडे खेचून आणणार का, याबाब उत्सुकता आहे. ही उत्सुकता कायम असताना मतदारसंघातील राजकीय वर्तुळात मात्र सध्या चर्चा आहे ती, पवार यांनी वापरलेल्या हटके फंड्याची.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आघाडी करुन लोकसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा तिढा सोडवला. हा तिढा सोडवताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. मात्र, या मतदारसंघातून उमेदवारी नेमकी द्यावी कोणाला हा सवाल पक्षनेतृत्वापुढे होता. कारण, या मतदारसंघातून अनेक नेते इच्छुक होते. खरे तर, उमेदवारीवरुन नेत्यांमध्ये होत असलेला पक्षांतर्गत संघर्ष हा सर्वपक्षीय चिंतेचा विषय आहे. राष्ट्रवादीतही हा प्रश्न डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे जागा एक इच्छुक अनेक अशा स्थितीत नेमक्या उमेदवारीसाठी काय मार्ग काढावा या विवंचनेत पक्षनेतृत्व असताना अजित पवार यांनी हा प्रश्न जाहीर मतदानाद्वारे सोडवला.
राष्ट्रवादीतून विलास लांडे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे आणि डॉ. अमोल कोल्हे अशी मंडळी उमेदवारीसाठी प्रामुख्याने आघाडीवर आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवबंधन सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. डॉ. कोल्हे यांचा रीतसर पक्षप्रवेश झाल्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. गेले तीन दिवस ही संवाद यात्रा सुरु आहे. परंतू, या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या मोठी आहे. या संख्येमुळे संवादयात्रेच्या कार्यक्रमात नेत्यांच्या समर्थकांकडून उमेदवारीसाठी अनेकदा घोषणाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मंचर येथील जाहीर सभेत अजित पवार यांनी थेट मतदानच घेतले. (हेही वाचा, शांत बसा, नाहीतर तिकीटच कापतो बघा एकेकाचं: अजिंत पवार)
आजित पवार यांनी इच्छुक नेत्यांची नावे व्यासपिठावरुन जाहीर वाचली आणि उपस्थितांना आपल्या पसंतीच्या नावासाठी हात वर करायला सांगितले. पवार यांनी एकेका इच्छुकाचे नाव घेतले त्याला त्यांच्यात्यांच्या समर्थकांकडून हात वर करुन कार्यकर्त्यांनी मतदान केले. पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव सर्वात शेवटी घेतले. पवार यांनी कोल्हे यांचे नाव उच्चारता कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने हात उंचाऊन एकच जल्लोष केला. या जल्लोषामुळे कोल्हे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तबबच झाले.