'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये संमतीने ठेवण्यात आलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाही : सुप्रीम कोर्ट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Getty Images)

लिव्ह इन रिलेशनशिप (Live-in relationship) मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फार मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 'लिव्ह इन'मध्ये असताना ठेवण्यात आलेले शारीरिक संबंध हे बलात्कार ठरत नाही असे कोर्टाने सांगितले आहे. 'लिव्ह इन'मध्ये असताना शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर जर त्या पुरुषाने जर त्या तरुणीशी लग्न केले नाही, तर तो बलात्कार ठरत नाही असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील एका महिला परिचारिकेने एका डॉक्टरविरोधात कोर्टात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

महाराष्ट्रातील एक महिला परिचारिका, पतीच्या निधनानंतर एका डॉक्टरकडे काम करू लागली. या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्यानंतर दोघे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू लागले. मात्र काही कारणास्तव डॉक्टरला त्या महिलेशी लग्न करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या महिलेने डॉक्टर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर डॉक्टरकडून सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. (हेही वाचा : लिव्ह-इन मध्ये राहताय ? या गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल)

या प्रकरणात पुरुष आणि स्त्री दोहोंनी आपल्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले होते, त्यामुळे याला बलात्कार म्हणून शकत नाही. मात्र अशा प्रकरणांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. पुरुषाचे खरेच महिलेवर प्रेम होते का? तो लग्न करण्यास तयार होता का? त्याचा फक्त शारीरिक संबंधच हा हेतू नव्हता ना? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे, असे न्या. ए के सिकरी आणि एस अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.