West Bengal: ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा नाही, अपघातामुळे झाली दुखापत- निवडणूक आयोग
Mamata Banerjee (Photo Credits: ANI)

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावरील कथित हल्ल्याबाबत निरीक्षक आणि मुख्य सचिवांच्या अहवालावर निवडणूक आयोगाने रविवारी बैठक घेतली. यानंतर ममतांवर हल्ला होण्याची शक्यता निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला असल्याचा कोणताही पुरावा नाही, तो निव्वळ एक अपघात होता. निरीक्षक आणि मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय यांच्या अहवालात निवडणूक आयोगाच्या वतीने हल्ल्याचा उल्लेख केलेला नाही तसेच दुखापतीचेही कारण दिले गेले नाही.

पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या बिरुलिया गावात 10 मार्च रोजी निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ठरवून हल्ला केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र आता असा कोणताही हल्ला झाला नाही अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या आरोपाचा गांभीर्याने विचार करून निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, विशेष पोलिस पर्यवेक्षक आणि विशेष निरीक्षकांकडून या घटनेबाबत अहवाल मागविला होता. बैठकीतील तिन्ही अहवाल पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीमागील कोणतेही षडयंत्र नाही. हा अहवाल दर्शवितो की ज्या वेळी हा अपघात झाला त्यावेळी ममता बॅनर्जी यांच्याभोवती खूप गर्दी होती.

सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुखापतीनंतर आता एक्शन मोडमध्ये आल्या आहेत. दुखापतीनंतर त्या प्रथमच व्हीलचेयरवर रोड शो करत आहेत. आज त्या व्हीलचेयरवरुन लोकांमध्ये उतरल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांधी मुर्तीपासून व्हीलचेयरवरून रोड शो केला. यानंतर सीएम ममता हजारा येथील मोर्चाला संबोधित करतील. (हेही वाचा: Mera Ration Mobile App: केंद्र सरकारने लॉन्च केले रेशनकार्ड धारकांसाठी खास मोबाईल अ‍ॅप; जाणून घ्या त्याची वैशिष्ट आणि कसं वापराल?)

या वेळी त्या म्हणाल्या, ‘आम्ही धैर्याने लढत राहू. मला अजूनही खूप वेदना होत आहेत, पण मला असे वाटते की लोकांच्या वेदना माझ्यापेक्षा जास्त आहेत. आमच्या पूजनीय भूमीचे रक्षण करण्याच्या लढाईत आम्ही बरेच कष्ट सहन केले आहेत आणि आम्ही अजून सहन करणार आहोत, पण भ्याडपणापुढे आम्ही कधीही झुकणार नाही.’