West Bengal: ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या, पायलटच्या समयसूचकतेमुळे टळली विमानांची टक्कर
Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

पश्चिम बंगालच्या मख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) प्रवास करत असलेल्या विमानाचा अपघात पायलटच्या समयसूचकतेमुळे टळला. ममता बॅनर्जी वाराणसी येथून पश्चिम बंगालला शुक्रवारी सायंकाळी परतत असताना हवेत असलेल्या त्यांच्या विमानासमोर अचानक दुसरे विमान (Flight) आले. त्यामुळे पायलटसमोर बाका प्रसंग निर्माण झाला. या वेळी ममता बॅनर्जी यांच्या पायलटने वेळीच समयसूचकता दाखवली आणि विमान उंचावर घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पश्चिम बंगालचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी विधानसभेत (West Bengal Assembly) जाण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा प्रसंग सांगितला.

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सायंकाळी वाराणीसी विमानतळावरुन एक विमान घेतले होते. ममतांना घेऊन जाणारे एक चार्टर्ड विमान एक एअर पॉकेटला धडकले. त्यामुळे विमान मोठ्या प्रमाणात हालले. मात्र, पायलटने विमान पुर्णपणे आपल्या नियंत्रणात आणले आणि या एअर पॉकेटमधून सहीसलामत बाहेर काढले. पायलटने हे विमान नेताजी सुभाष चंद्र अंतरराष्ट्रीय एयरपोर्ट वर सुरक्षीत लँड केले. हे विमान दसॉल्ट फाल्कन 2000 आहे. याचे वजन केवळ 10.3 टन इतके असल्याचे सांगितले जात आहे. 19 लोकांना वाहून नेण्याची विमानाची क्षमता असल्याचे समजते. (हेही वाचा, KMC Poll Result 2021: 'खेला होबे', पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा टीएमसी पॉवरफुल; कोलकाता महापालिका निवडणुकीत TMC-116, भाजपला केवळ 3 जागा)

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे विमानातील संदेशवहनात अडथळा आला. परिणामी दुसरे एक विमान ममता यांच्या विमानासमोर आहे. दोन्ही विमाने समोरासमोर आल्याने अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र, हा अनर्थ थोडक्यात टळला. विमानोड्डान विभागाने याला टर्बुलन्स असल्याचे सांगितले होते. यावरुन राज्य सरकारने विमान उड्डाण महानिदेशालय (डीसीसीए) कडे एक अहवाल मागितला आहे.

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, ज्या समेवर त्यांचे विमान होते. त्याच समेवर आणखी एक विमान समोरुन आले. पायलटने आपली समयसूचकता दाखवत ममता यांचे विमान 8000 फूट उंचावर घेतले. ज्यामुळे समोरचे विमान निघून गेले. तसेच, संभाव्य धोकाही टळला. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमानात बरीच अशांतता निर्माण झाली. त्यामुळे विमानात घडलेल्या हालचालींमुळे अद्यापही आपली कंबर दुखत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.