वैष्णो देवी यात्रा केवळ 8 तासांत, वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस आजपासून सुरु
Vande Bharat Express (Photo Credits: Twitter)

जम्मू-कश्मीरमधील (Jammu-Kashmir) भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वैष्णो देवीला (Vaishno Devi) जाण्यासाठी रेल्वेने आजपासून वंदे भारत (Vande Bharat) ही सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु केली आहे. या एक्सप्रेसमुळे आपण केवळ 8 तासांत दिल्ली ते कटरा प्रवास करता येणार आहे. यामुळे जम्मू-कश्मीर पर्यटनालाही चालना मिळेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष ट्विट करत या एक्सप्रेस सेवेचे स्वागत केले आहे. तसेच ही जम्मू-कश्मीरच्या लोकांसाठी नवरात्रीची विशेष भेट असेल असेही त्यांनी सांगितले आहे.

या एक्सप्रेसचा वेग प्रति तासाप्रमाणे 180 किमी असेल. यात प्रवाशांसाठी खूपच आरामदायी अशा सेवा-सुविधा देण्यात आल्या आहेत. 22439 वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 6 वाजता नवी दिल्लीवरुन सुटेल आणि दुपारी 2 वाजता कटरा स्थानकात पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी 22440 वंदे मातरम एक्सप्रेस दुपारी 3 वाजता कटरावरून सुटेल जी रात्री 11 वाजता दिल्ली स्थानकात पोहोचेल. या रेल्वेच्या CC तिकिट 1620 रुपये तर EC क्लासची तिकिट 3015 रुपये इतकी असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास ट्विट करत या रेल्वेला शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, हर्षवर्धन आणि जितेंद्र सिंह यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत नवी दिल्ली स्टेशनवर रवाना केली. हेही वाचा- जल शक्ति मंत्रालयाकडून सर्वश्रेष्ठ स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाणांची यादी जाहीर, वैष्णो देवी मंदिराने मिळवले पहिले स्थान

या एक्सप्रेसच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ही पूर्ण रेल्वे वातानुकूलित असेल. तसेच 16 डब्ब्यांची ही रेल्वे चेअर कार प्रकारातील असेल. या रेल्वेचे डब्बे ऑटोमॅटिक असतील, ज्यात स्लायडिंग फुट स्टेप असतील.