V Sugnana Kumari Deo: सलग 10 वेळा आमदार, 50 वर्षांचा संसदीय राजकारणाचा अनुभव; आमदार व्ही सुगना कुमारी देव यांचे निधन

त्या 87 वर्षांच्या होत्या.

V Sugnana Kumari Deo | | (Photo Credits: Facebook)

V Sugnana Kumari Deo Passes Away: एकदोन नव्हे तर तब्बल 10 वेळा म्हणजेच जवळपास 50 वर्षे सलग आमदार राहिलेल्या बिजू जनता दल (Biju Janata Dal) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आमदार व्ही सुगना कुमारी देव (V Sugnana Kumari Deo) यांचे चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. पाठिमागील काही काळापासून त्या प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. ओडिशाचे मुख्यमत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) आणि त्यांच्या पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. पक्षनेत्यांची शुक्रवारी भेट झाल्यानंतर काहीच तासांनी म्हणजेच शनिवारी (10 फेब्रुवारी) मध्यरात्री एक वाजणेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव

आमदार व्ही सुगना कुमारी देव यांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्या खल्लीकोटच्या राजघराण्यातून येतात. उल्लेखनीय म्हणजे पाठिमागील जवळपास पाच दशके मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांनीही मतदारांच्या विश्वासाला तडा न पोहोचवता आयुष्यभर बांधीलकीने काम केले. मतदारसंघामध्ये विविध विकासकामे राबवली ज्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होत गेला. त्यांच्या निधनाबद्दल ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास, नवीन पटनायक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर अनेक मान्यवरांनी देव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Ganpatrao Deshmukh Passes Away: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

पहिल्यांदा 1963 मध्ये ओडिशा विधानसभेवर आमदार

व्ही सुगना कुमारी देव पहिल्यांदा 1963 मध्ये ओडिशा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर त्यांनी कधीच पराभव पाहिला नाही. खल्लीकोट विधानसभा मतदारसंघातून त्या आठ वेळा आमदार राहिल्या. त्यानंतर कबिसूर्यनगर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिल्या. मृत्यूसमईसुद्धा त्या आमदारच होत्या. विधानसभा निवडणूक 1963, 1974, 1977, 1985, 1990, 1995, 2000, 2004, 2009 आणि 2014 मध्ये त्या आमदार म्हणून निवडून आल्या. अलिकडील काही काळात प्रकृतीअस्वास्थामुळे सार्वजनिक जीवनावर मर्यादा आल्या होत्या. (हेही वाचा, Keshavrao Dhondge Passes Away: ज्येष्ठ शेकाप नेते केशवराव धोंडगे यांचे निधन 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्ही सुगना कुमार देव यांच्या निधनाचे वृत्त समजताच तीव्र दु:ख व्यक्त केले. एक्स हँडलवरुन आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, त्या बीजेडीच्या खूप ज्येष्ठ नेत्या होत्या. त्यांनी पक्षासाठी खूप योगदान दिले. खलीकोट आणि कबिसूर्यनगर या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधित्व करून त्यांनी जनसेवेत आपली छाप सोडली आहे. त्या 10 वेळा विधानसभेवर निवडून आल्या. त्यांचे निधन ही कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबाप्रती माझी मनापासून संवेदना.