IPL Auction 2025 Live

अभिमानास्पद! उल्हासनगरची प्रांजल पाटील ठरली पहिली दृष्टिहीन IAS अधिकारी; जाणून घ्या तिचा प्रवास

यामागे कारण असे की, प्रांजल या देशातील पहिलीच दृष्टिहीन आयएएस अधिकारी आहेत

Pranjal Patil (Photo Credits: ANI)

उल्हासनगर (Ulhasnagar) येथील रहिवाशी प्रांजल पाटील (Pranjal Patil)  यांनी आज, (14 ऑक्टोबर) रोजी तिरुवअनंतपूरम (Thiruvananthapuram) येथे उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारत सर्वांसमोर एक प्रेरणादायी स्थान मिळवले आहे. यामागे कारण असे की, प्रांजल या देशातील पहिलीच दृष्टिहीन आयएएस अधिकारी आहेत. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आणि त्यासाठी कोणत्याही संकटाला पार करण्याची जिद्द ठेवणाऱ्या प्रांजल यांना लहानपणापासूनच कमजोर दृष्टीचा त्रास होता. त्यातच वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची दृष्टी पूर्णतः गेली, यावेळी खचून न जाता जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करत प्रांजल यांनी आपला आजवरचा प्रवास पार केला आहे. इतकेच नव्हे तर अगदी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 773 वे स्थान पटकावले आहे. आज त्यांची केरळ कॅडर मध्ये त्यांची नियुक्ती झाली, याच निमित्ताने प्रांजल यांच्या प्रवासावर एक नजर टाकुयात..

प्रांजल पाटील यांनी मुंबईतील दादर येथील श्रीमती कमला मेहता शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. ही शाळा विशेषतः अंध मुलांसाठी असल्याने इथे त्यांना ब्रेल लिपीत शिकवले जात होते. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी चंदाबाई कॉलेजमधून कला शाखेतून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी बारावीत सुद्धा 85% इतके घसघशीत यश मिळवल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले.या सर्व शैक्षणिक वाटचालीत कुठेही आयएएस बनण्याचे त्यांनी ठरवले नव्हते मात्र कॉलेज मध्ये असताना युपीएससी संदर्भात एक लेख त्यांच्या हाती लागला आणि त्यातूनच या स्वपनाची सुरुवात झाली. हळूहळू परीक्षेची सर्व ,माहिती गोळा करून तयारी करण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली.

दिल्ली मधील जेएनयू विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून दृष्टिहीन लोकांसाठी असलेल्या 'जॉब अॅक्सेस विथ स्पीच' या विशेष सॉफ्टवेअरचा वापर सुरु केला. यंदा ही परीक्षा देऊन प्रांजल यांनी पहिल्याच वेळी यश संपादन केले व आजपासून त्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.