Tamil Nadu: लहान मुलांच्या शोमध्ये उडवली PM Narendra Modi यांची खिल्ली; वाहिनीवर मंत्रालयाची कारवाई, 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश 
Narendra Modi | (Photo Credit: PMO)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची खिल्ली उडवणारा मजकूर प्रसारित केल्याबद्दल झी समूहाच्या ‘झी तमिळ’ (ZEE Tamil) वाहिनीला नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मीडिया हाऊसला नोटीसवर सात दिवसांत उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. पंतप्रधानांविरुद्ध आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित केल्याबद्दल त्यांना सात दिवसांत उत्तर द्यावे लागेल, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तसे न केल्यास पुढील कारवाई केली जाईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आणि इतरांच्या तक्रारीनंतर जी तामिळवर ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, चॅनलवर एक गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये पंतप्रधानांची खिल्ली उडवणारा कंटेंट प्रसारित करण्यात आला होता. अन्नामलाई यांनी ट्विट केले की केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन या प्रकरणी चौकशी करत आहेत आणि त्यांनी कारवाईचे आश्वासनही दिले आहे. त्याच वेळी, राज्य आयटी सेल आणि सोशल मीडियाचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी चॅनलला पत्र लिहून कार्यक्रम बंद करण्यास सांगितले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, झी तमिळच्या प्रवक्त्याने या आरोपांवर सांगितले की, ते या संदर्भात कोणतेही वक्तव्य देण्यास तयार नाहीत.

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या मुख्य क्लस्टर ऑफिसरला लिहिलेल्या पत्रात, भाजपच्या राज्य युनिट आयटी आणि सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार म्हणाले, '15 जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या 'ज्युनियर सुपर स्टार्स सीझन 4' या चॅनलच्या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्यावर पोशाख, त्यांचे विविध देशांचे दौरे, निर्गुंतवणूक आणि नोटाबंदी याबाबत अनेक टिप्पणी करण्यात आल्या.’

सीटीआर निर्मल कुमार म्हणाले की, ‘10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या विषयांचा अर्थ समजणे अशक्य आहे. विनोदाच्या नावाखाली पंतप्रधानांविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या गेल्या. या कार्यक्रमादरम्यान, जज,  अँकर आणि मार्गदर्शक अशा विषयांवर संकोच न करता प्रोत्साहन देताना दिसले. यामुळे चुकीचा संदेश जनतेपर्यंत गेला.’ (हेही वाचा: इतकं खोटं Teleprompter सुद्धा पेलू शकला नाही; राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला)

भाजप नेत्याने पुढे सांगितले की, 'चॅनेलने मुलांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. कार्यक्रमात जे काही बोलले जात होते ते त्यांच्या आकलनाच्या पलीकडे आहे आणि त्यासाठी या मुलांचे पालक आणि चॅनेल यांना कायदेशीर आणि नैतिकरित्या जबाबदार धरले पाहिजे.‘ त्यांनी चॅनेलला जाहीरपणे माफी मागावी आणि या कंटेंटसाठी जबाबदार असलेल्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.