गोव्यात Sunburn Festival च्या पहिल्याच दिवशी दोन तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पर्यटन मंत्र्यांनी राजीनामा देण्याची कॉंग्रेसची मागणी
Sunburn Music Festival (Photo Credits: IANS)

गोव्यामध्ये (Goa) प्रसिद्ध असा सनबर्न क्लासिक इडीएम फेस्टिवल (Sunburn Electronic Dance Music Festival) शुक्रवारपासून सुरु झाला आहे. गोव्याच्या वागतोर येथे हा फेस्टिव्हल आयोजित केला गेला आहे. या फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र याचे खरे कारण काही वेगळेच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोघांचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवनाने झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे प्रमोद सावंत यांचे भाजप सरकार गोव्यात अंमली पदार्थांचा वापर होत नसल्याचे सांगत आहे, त्यावर प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.

साई प्रसाद (31) व वेंकट (26) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नवे आहेत. हे दोन्ही तरुण आंध्रप्रदेश व हैद्राबाद येथील आहेत. फेस्टिव्हल सुरु होण्याच्या आधी या दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयाल हलवण्यात आले. मात्र या दरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलीसांनी सांगितले. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागत आहे. गोव्यात अंमली पदार्थांचा वापर होत आहे या मुद्यावरून कॉंग्रेसने भाजपवर हल्ला चढवला आहे. (हेही वाचा: भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 14 वर्षांनी गोवा झाला होता मुक्त; अवघ्या 36 तासात पोर्तुगीजांनी पत्करली होती शरणागती, जाणून इतिहास)

भाजप नेत्यांच्या मदतीनेच गोव्यात अंमली पदार्थांचा व्यापार फोफावला असल्याचा आरोप देश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. त्यात या तरुणांच्या शवविच्छेदनाच्या अहवालातही भाजपचा हस्तक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पर्यटन मंत्री आजगावकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, यापूर्वी अनेकदा हा फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मुख्यत्वे यादरम्यान होत असलेल्या ड्रग्जच्या वापरामुळे या फेस्टिव्हलला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनी या फेस्टिव्हलचा आग्रह धरल्याने त्याचे आयोजन केले गेले.