Supreme Court on Nupur Sharma: सर्वोच्च न्यायालयाचा नूपुर शर्माला मोठा दिलासा; देशभरात नोंदवलेले सर्व FIR दिल्लीला हस्तांतरित करण्याचे आदेश
Nupur Sharma | (Photo Credit: Twitter)

Supreme Court on Nupur Sharma: प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा विरुद्ध देशभरात नोंदवलेल्या एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. आता या सर्व एफआयआरची एकत्रित सुनावणी होणार आहे. याशिवाय, नूपूर शर्माविरुद्धच्या सर्व एकत्रित एफआयआर तपासासाठी दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत नुपूर शर्माच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्व प्रलंबित आणि भविष्यातील एफआयआरमध्येही हा आदेश कायम राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नुपूर शर्माविरुद्ध महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पश्चिम बंगाल, राजस्थानमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने त्यांना हा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकदा याचिका फेटाळल्यानंतर नुपूर शर्मा पुन्हा न्यायालयात पोहोचल्या होत्या. यापूर्वी 19 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या अटकेला 10 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. (हेही वाचा - Senior Citizen Rebate: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत मिळण्यासाठी संसदीय समितीकडून शिफारस)

दरम्यान, 8 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने प्रेषित वादाशी संबंधित नुपूर शर्मा प्रकरणात पत्रकार नाविका कुमार यांना दिलासा दिला होता. विविध राज्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयाने त्याच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह गोष्टी प्रसारित करण्याशी संबंधित आहे. या प्रकरणी नुपूरशिवाय पत्रकार नाविका कुमार यांच्याविरोधातही वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या शोबाबत भविष्यात एफआयआर दाखल झाल्यासही ही सूट कायम राहील आणि नाविका कुमारला अटक होणार नाही. ज्या राज्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले आहेत त्यांना नोटीस बजावून उत्तरे मागवण्यात आली आहेत.

नूपूरला न्यायालयाने फटकारले होते -

विशेष म्हणजे, यापूर्वी जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करून आपल्याविरोधात देशभरात दाखल असलेल्या खटल्यांची सुनावणी दिल्लीत व्हावी, अशी मागणी केली होती. तिच्या जीवाला धोका असल्याचेही नुपूरने म्हटले होते. मात्र, त्यानंतर न्यायालयाने नुपूरला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. एवढेच नाही तर न्यायालयाने त्यांना फटकारले होते.

न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, तिला धोका आहे की तिच्यापासून सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे? त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण देशात भावना भडकावल्या आहेत, त्याला त्या एकट्याचं जबाबदार आहेत. नुपूर शर्मा यांनी माफी मागण्यास आणि वक्तव्य मागे घेण्यास बराच विलंब झाला, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने फटकारल्यानंतर नुपूरच्या वकिलाने याचिका मागे घेतली.