COVID-19 Cases in India: भारतात 68,898 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,05,824 वर
Coronavirus (Photo Credits: Twitter)

भारत आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशात मागील 24 तासांत 68,898 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,05,824 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 983 रुग्ण दगावले असून आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 54,849 वर पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे. सद्य घडीला भारतात 6,92,028 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तर आतापर्यंत 21,58,947 रुग्ण बरे होऊन त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात काल एकाच दिवसात 9 लाखाहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. Coronavirus Cases in Maharashtra: मागील 24 तासांत 14,492 नव्या रुग्णांसह महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,43,289 वर

कोरोना चाचण्यात नियमितपणे वाढ झाल्याने बाधित रुग्णांच्या दरात कमालीची घट झाली आहे. मोठ्या संख्येने चाचण्या घेण्यात आल्यामुळे सुरुवातीला बाधित रुग्णांचा दर वाढेल. परंतु, अनेक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे की, त्वरित अलगीकरण, प्रभावी शोधकार्य आणि वेळेवर व्यवस्थापन यासारख्या इतर उपायांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईल.