अमेठी: स्मृती ईराणी यांचे निकटवर्तीय कार्यकर्ता सुरेंद्र सिंह हत्येप्रकरणी तिघांना अटक, दोघांचा शोध अद्याप सुरु

लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशातील अमेठी येथे भाजप खासदार स्मृती ईराणी (Smriti Irani) यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे.

OP Singh, UP DGP on ex-village head of Amethi who was shot dead (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशातील अमेठी येथे भाजप खासदार स्मृती ईराणी (Smriti Irani) यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंह असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो बरौलिया गावाचा रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. नसीम, धर्मनाथ गुप्ता आणि बी.डी.सी रामचंद्र अशी या तिघांची नावे आहेत. अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट होते की,  5 संशयित आणि हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यामध्ये राजकीय वैमनस्य होते.  (अमेठी: स्मृती ईराणी यांच्या सुरेंद्र सिंह नामक निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी मारुन हत्या)

ANI ट्विट:

सुरेंद्र सिंह यांच्या हत्येनंतर स्मृती इराणी यांनी तातडीने अमेठीकडे धाव घेत सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसंच आरोपींना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे त्या म्हणाल्या होत्या.

शनिवारी (25 मे) रात्री सुरेंद्र सिंह घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.