लखनौ, नोएडा आणि बेंगळुरू येथे जनता कर्फ्यूचा उत्साह; लोकांनी टाळ्या, थाळ्या वाजवून केली Janta Curfew Rehearsal (पहा व्हिडिओ)
जनता कर्फ्यू रिहर्सल (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटना पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 22 मार्च रोजी, सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूचे (Janta Curfew) आवाहन केले आहे. या काळात जास्तीत जास्त लोक घरात राहतील व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी याचा उपयोग होईल हा यामागचा हेतू आहे. मात्र संध्याकाळी पाच वाजता जनतेने देशातील डॉक्टर, पोलिस, मीडिया कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, होम डिलिव्हरी करणारे लोक अशा संकटकाळात मदत करणाऱ्या लोकांसाठी, कृतज्ञता म्हणून, आपल्या खिडक्या आणि दाराजवळ उभे राहून टाळ्या वाजवण्यास सांगितले आहे. अशात शनिवारी लखनौ, नोएडा आणि बेंगळुरूमधील काही सोसायट्यामधील लोकांनी आज त्याची रिहर्सल केली.

बेंगळूरूमध्ये सोसायटीमधील अनेक लोक आपापल्या बाल्कनीमध्ये एकत्र जमले होते. प्रत्येकाच्या मनात उत्साह भरला होता व अशा वातावरणात सर्वांनी एकत्र टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या. अशा प्रकारे एक दिवस आधी लोकांनी 'जनता कर्फ्यू' ची तालीम केली. यावेळी येथील लोकांनी भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या. उद्या देशात सर्वजणच संकटकाळात मदत करणाऱ्या लोकांना अभिवादन करणात आहेत. आज बेंगळूरूसह अनेक शहरांत त्याची रिहर्सल पाहायला मिळाली. (हेही वाचा: Janata Curfew: कोरोना व्हायरसमुळे रेल्वेने रविवारी रद्द केल्या 3,700 पेक्षा अधिक गाड्या)

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या काही व्हिडिओमध्ये, लोक संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या बाल्कनीमध्ये उभे राहून जोरदार टाळ्या वाजवताना दिसत आहेत. त्याचबरोबर नोएडाच्या सेक्टर-74 स्थित ग्रँड अजनार हेरिटेज सोसायटीच्या रहिवाशांनीही मोठा उत्साह दाखविला. सलग पाच मिनिटे त्यांनी टाळ्या वाजवून, अशा कोरोना विषाणूच्या संकटकाळात आपली पर्वा न करता इतरांची मदत करणाऱ्या लोकांचे आभार मानले.