...तर 125 कोटी भारतीयांचे नावही 'राम' ठेवा- हार्दिक पटेल
हार्दिक पटेल (Photo Credit: PTI)

नाव बदलल्यामुळे देशाची प्रगती होणार असेल तर देशातील 125 कोटी नागरिकांचे नाव राम ठेवा, असा टोला पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपला लगावला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता, सीबीआय वाद यांसारख्या अनेक समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करत राम मंदीराचा मुद्दा वारंवार चर्चिला जात आहे, असेही ते म्हणाले.

बुधवारी उत्तर प्रदेशातील संभल येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केले. शत्रूशी सामना करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा शत्रूची बाजू अधिक भक्कम होईल असेही ते म्हणाले. राम मंदीराचा मुद्दा रेटून हिंदू मते मिळवण्याचा भाजपचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. तसंच उत्तर प्रदेशातील बेरोजगारीच्या प्रश्नावर तोगडा काढण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अलिकडेच भाजप सरकारने अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या केले. यावरुनही पटेल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. नाव बदलल्यामुळे देशातील शहरांचा विकास होणार असेल तर 125 कोटी भारतीयांचे नावही राम ठेवावे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.