Momos (फोटो सौजन्य - X/@ShabazBaba)

मोमोज (Momos) प्रेमींना सावध करणारी एक बातमी समोर आली आहे. पंजाबमधील (Punjab) मोहाली येथील एका मोमो फॅक्टरीच्या फ्रीजमध्ये कुत्र्याचे डोके आढळले आहे. कारखान्यात अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याबाबत आरोग्य आणि अन्न विभागाला अनेक तक्रारी आल्या होत्या. यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्यावर छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांना कारखान्यात कुजलेल्या भाज्या, माती आणि कुत्र्याचे डोके आढळले. हा कारखाना गायटोर गावात आहे. तो मोहाली, चंदीगड आणि पंचकुला येथे मोमोज, स्प्रिंग रोल आणि इतर वस्तू पुरवत असे.

छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांनी कारखान्यातून 50 किलो कुजलेले मांस, क्रशर मशीन आणि कुजलेल्या भाज्या जप्त केल्या. यावेळी फ्रीजमध्ये कुत्र्याचे डोके आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुत्र्याचा मृतदेह गायब होता. मात्र, मोमोजमध्ये कुत्र्याचे मांस वापरले गेले होते की स्प्रिंगरोल्समध्ये हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जप्त केल्लेल्या गोष्टी पाहता असे दिसून येते की, मांस कोणत्या ना कोणत्या प्रकारे कापून प्रक्रिया करण्यात आले होते.

मोमोज पुरवणाऱ्या कारखान्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये आढळले 'कुत्र्याचे डोके':

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि या कारखान्यात 10 कर्मचारी काम करतात. अधिकाऱ्यांनी छापे टाकल्याची माहिती मिळताच सर्व कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. कारखान्यात नेपाळमधील लोक काम करत होते. आता पोलिसांनी फरार कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. काही लोकांनी सोशल मीडियावर कारखान्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोमोज आणि स्प्रिंगरोल्सची खराब आणि अस्वच्छ तयारी दाखवली आहे. (हेही वाचा: TikTok Star Efecan Kultur Dies: अती खाण्याने घेतला बळी; Mukbang व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेला एक्स्ट्रीम इटर टिकटॉक स्टार इफेकान कुल्टूर याचे लठ्ठपणामुळे निधन)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान कारखान्यातून जप्त केलेले मांस चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कारखान्यात कोंबडीच्या नावाखाली इतर प्राण्यांचे मांस वापरल्याची माहिती आहे. दुसरीकडे, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनाही धक्का बसला आहे. स्थानिक लोकांच्या मनात अशी भीती आहे की, त्यांना मोमोजमध्ये कुत्र्याचे मांस खायला दिले गेले असावे. कारखान्यात मोमोज आणि स्प्रिंग रोल अतिशय घाणेरड्या पद्धतीने बनवले जात होते.