पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर; 'अहमदाबाद मेट्रो'च्या पहिल्या टप्प्याचे  मोदींच्या हस्ते उद्घाटन
PM Narendra Modi (Photo Credit: IANS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (सोमवार, 4 मार्च) एकदिवसीय गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मोदी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ करतील. त्याचबरोबर अहमदाबाद मेट्रो सेवेच्या (Ahmedabad Metro Service) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी उमिया धाम मंदिराचे (Umiya Dham Temple) भूमिपूजन करतील. त्याचबरोबर शिक्षण भवन आणि विद्यार्थी भवनाचे उद्घाटन करण्यासाठी गांधीनगरच्या अडालज येथील अन्नपूर्णा धाम ट्रस्टमध्ये हजेरी लावतील.

गुजरात मेट्रो रेल निगमची (GMRC) 31 जानेवारी रोजी चाचणी फेरी झाली होती. त्याचदरम्यान मार्च 2019 मध्ये मेट्रोची अधिकृत सेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. 900 मीटरची चाचणी फेरी यशस्वी झाल्यानंतर आता मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर होते. यात वायब्रेंट गुजरात समिट आणि अहमदाबाद येथील एका हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.