'मन की बात' मधून मोदींचे तरुणांना 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: ANI)

आकाशवाणीवर 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी होत असलेला हा 49 वा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी देश-विदेशातील विविध मुद्यांवर आपले मत मांडतात.

आज झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 ऑक्टोबरला असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. त्याचबरोबर जगातला सर्वात मोठा पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं त्याच दिवशी अनावरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरदार पटेलांनी कठीण प्रसंगात देशाला सावरले आणि एकात्मता निर्माण करण्याचे कठीण काम केलं. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त देशातील सर्व तरुणांना 'रन फॉर युनिटी' मध्ये सहभागी होण्याचे आवाहनंही त्यांनी केले.

11 नोव्हेंबरला पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांनी सैनिकांच्या शौर्याचे कौतुकही केले. युद्ध करण्याची वेळ आल्यास आम्ही कोठेही कमी पडणार नाही, हे या युद्धातील शौर्याने जगाला दाखवून दिले, असेही मोदी म्हणाले. त्याचबरोबर 2018 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल मोदींनी खेळाडूंचे कौतुक केले. त्याचबरोबर भारतीय हॉकी टीमला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

31 ऑक्टोबरला आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असल्याचे सांगत त्यांनी इंदिरा गांधींनाही आदरांजली वाहिली.

जकार्तामध्ये झालेल्या अशियन पॅरा गेम्सध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंना भेटण्याचा योग आला. त्यांचे सर्व अडचणींवर मात करण्याचे त्यांचे धैर्य खरंच प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतातने यंदा 72 पदकांची कमाई करत नविन विक्रम रचला.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या अनावरणाचा कार्यक्रम दुरदर्शनवर प्रसारित केला जाईल. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या ऑफिशियल युट्युब चॅनलवर देखील प्रदर्शित केला जाईल. तसंच www.allindiaradio.gov.in.या वेबसाईटवरही हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येईल. हा कार्यक्रम पाहायचा राहून गेल्यास ऑल इंडिया रेडिओवर प्रादेशिक भाषांमध्येही रात्री 8 वाजता तुम्ही याचे पुनःप्रसारण ऐकू शकता.