PM Modi Launches COVID-19 Vaccination Drive: ‘Dawai bhi, Kadai bhi’ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला नवा मंत्र
त्याचबरोबर अतर लसींवरही वेगाने काम सुरु आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.
देशात कोविड-19 लसीची (Covid-19 Vaccine) खूप काळापासून प्रतिक्षा होती आणि आज (16 जानेवारी) ती उपलब्ध झाली आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व देशवासियांचे अभिनंदन केले. साधारणपणे लस मिळण्यासाठी खूप काळ लागतो. परंतु, खूप कमी वेळात भारताने एक नव्हे दोन लसी विकसित केल्या आहेत. त्याचबरोबर इतर लसींवरही वेगाने काम सुरु आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले. तसंच 'दवाई भी, कडाई भी' (Dawai bhi, Kadai bhi) हा नवा मंत्र मोदींनी देशवासियांना दिला.
कोरोना लसीचे दोन डोस घेणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यात महिन्याभराचे अंतर असायला हवे, याचीही आठवण मोदींनी यावेळी करुन दिली. लसीचा एक डोस घेतल्यानंतर कोरोना विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास 2 आठवड्यांचा कालवधी लागतो. दरम्यान, लस मिळाली तरी मास्क न घालण्याची आणि सोशल डिस्टसिंग न पाळण्याची चूक करु नका, असेही आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे दवाई भी आणि कडाई भी म्हणजे लस घेतली तरी नियम पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
इतक्या मोठ्या प्रमाणात अशा लसीकरण मोहिमेचे इतिहासात प्रथमच आयोजन केले जात आहे. जगात 100 हून अधिक देशांची लोकसंख्या 3 कोटींपेक्षा कमी आहे. तर भारतात पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसंच कोविड-19 वरील लस पूर्णपणे सुरक्षित असून वैद्यकीय तपासणीतून ती गेली आहे. त्यामुळे लसीसंदर्भातील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (COVID-19 Vaccination in India: देशात उद्यापासून सुरु होणार कोविड-19 लसीकरण; जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या मोहिमेबाबत काही महत्त्वाच्या बाबी)
दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊनच्या कठीण काळाचे स्मरण करत मागील वर्षाने आपल्याला खूप काही शिकवले असल्याचे मोदींनी सांगितले. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आपण जगासमोर उदाहरण ठेवले आहे. या कोरोना महामारीत देशाने केलेल्या कामगिरीचा पाढाही त्यांनी वाचला.
लसीकरण मोहिम अधिक व्यापक स्वरुप धारण करेल असे सांगत त्यांनी सर्व देशवासियांना लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सर्व स्वस्थ, निरोगी राहावेत, अशी इच्छाही व्यक्त केली.