PM Modi चा उद्याचा पश्चिम बंगाल दौरा रद्द, संध्याकाळी 5 वाजता करणार व्हर्च्युअल रॅली
PM Narendra Modi. (Photo Credits: ANI)

भारतात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. कोरोनाची ही भीषण स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्या पश्चिम बंगालमधील (West Bengal) दौरा रद्द केला असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. दरम्यान उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. दरम्यान उद्या संध्याकाळी 5 वाजता ते व्हर्च्युअल रॅली करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तसेच ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्याचे मार्ग आणि उपाय यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली. यात कोरोना संबंधी अनेक महत्त्वांच्या उपाययोजनांसंबंधी चर्चा झाली.हेदेखील वाचा- Emirates कडून दुबई आणि भारतासाठी विमानसेवा येत्या 25 एप्रिल पासून 10 दिवसांसाठी रद्द, वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय

या बैठकीत विविध राज्यांची ऑक्सिजनची मागणी ओळखून त्यानुसार त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय साधून विशेष प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवणे, ऑक्सिजनच्या वितरणाचा वेग वाढवणे आणि आरोग्य सुविधा केंद्रांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करणे अशा विविध पैलूंबाबत वेगाने काम करण्याची गरज पंतप्रधानानी या बैठकीत व्यक्त केली.

दरम्यान भारतामध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. आज 24 तासांत 3,14,835 नव्या कोरोनाबाधितांचे निदान आणि 2,104 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. यामुळे भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 कोटी 59 लाख 30 हजार 965 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजार 657 वर पोहोचली आहे.