अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर कॉंग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन; ट्रम्प यांना दिला इशारा
Rahul Gandhi & Narendra-Modi (Photo Credit: PTI)

अफगाणिस्तानातील (Afghanistan) एका ग्रंथालयाला (Library) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दिलेल्या निधीवरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टीका केली आहे. या निधीचा त्या देशाला काही उपयोग झाला नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मोदींवर झालेल्या टीकेवर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तानाच्या विकास कामासंबंधित भारताला अमेरिकेकडून उपदेश घेण्याची गरज नसल्याचे काँग्रेसने ट्रम्प यांना सुनावले आहे. त्याचबरोबर ही टीका अस्वीकृत असून यावर भारत सरकार योग्य ते उत्तर देईल, अशी आशाही काँग्रेसने व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची उडवली खिल्ली म्हणाले ' आत थँक्यू बोलू काय?' 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले की, "प्रिय ट्रम्प, भारताच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवणे बंद करा. अफगाणिस्तानासंदर्भात भारताला अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारच्या उपदेशाची गरज नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भारताने अफगाणिस्तानाला नॅशनल असेंबलीच्या इमारत उभारणीसाठी मदत केली होती. मानवी गरजांसोबत राजनैतिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानच्या बांधवांची मदत करत असतो."

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी सांगितले की, "भारताच्या पंतप्रधानांबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. आम्हाला आशा आहे की, सरकार याचे सडेतोड उत्तर देईल आणि अफगाणिस्तानात रस्ते, धरणं बांधण्यासाठी तीन अरब डॉलरची मदत करण्याचे आश्वासन भारताने दिले असल्याची आठवण ट्रम्प यांना करुन देण्यात येईल."

अफगाणिस्तानातील एका ग्रंथालयाला मोदींनी निधी दिल्यानंतर युद्ध प्रभावित देशात याचा काही उपयोग नाही, अशी टीका ट्रम्प यांनी मोदींवर केली. त्याचबरोबर अफगाणिस्तानाच्या संरक्षणासाठी पुरेसे काम न केल्यानेही ट्रम्प यांनी भारत आणि इतर देशांवर निशाणा साधला आहे.