New Growth Centers: भारतातील टियर II शहरे बनत आहेत नवीन विकास केंद्रे; 2023 मध्ये जवळपास 35 प्रमुख ब्रँड्सचा 14 शहरांमध्ये प्रवेश
Growth (Photo Credit : Pixabay)

Tier II Cities Emerge As New Growth Centres: देशातील अनेक टियर-II शहरे (Tier-II Cities) आता नवीन विकास केंद्रे म्हणून उदयास येत आहेत. नाइकी, झारा, स्केचर्स आणि अदिदाससारख्या जवळपास 35 प्रमुख देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किरकोळ ब्रँड्सनी जानेवारी-सप्टेंबर 2023 दरम्यान चंदीगड, जयपूर आणि लखनऊसह 14 श्रेणी-II शहरांमध्ये प्रवेश केला. सीबीआरई साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या अग्रगण्य रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या, ‘टियर-II सिटीज: द टाइम टू शाइन’ या अहवालात हे निष्कर्ष समोर आले आहेत.

या 14 शहरांमध्ये चंदीगड, जयपूर, इंदूर, गोवा, मंगलोर, कोची, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, विझाग, म्हैसूर आणि कोईम्बतूर यांचा समावेश आहे. अहवालानुसार, क्रोमा, अरमानी एक्सचेंज, मलबार गोल्ड अँड डायमंड्स, रिलायन्स स्मार्ट, तनिष्क, एच अँड एम, मार्क्स अँड स्पेन्सर, जीएपी, स्टारबक्स, पिझ्झा एक्सप्रेस, अंडर आर्मर सारख्या इतर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किरकोळ ब्रँड्सनी जानेवारी-सप्टेंबर 2023 कालावधीत टियर-II शहरांमध्ये त्यांचा विस्तार केला आहे.

सीबीआरई इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, सल्लागार आणि व्यवहार सेवा, राम चंदनानी म्हणतात, ‘टियर-II शहरांनी गेल्या तीन वर्षांत किरकोळ विकासात मोठी वाढ नोंदवली आहे. या ठिकाणी विकासकांना नवीन मॉल्स विकसित करण्याव्यतिरिक्त त्यांच्या विद्यमान सुविधा एकत्रित आणि अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. शिवाय, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड्स नॉन-मेट्रो शहरांमध्ये विस्तार करू पाहत आहेत.’ (हेही वाचा: Google Pay Outside India: भारताबाहेर UPI payments ची सेवा देण्यासाठी गूगल पे चा NPCI सोबत करार)

सीबीआरईचे अंशुमन मॅगझीन यांच्या मते, ‘ई-कॉमर्सची भरभराट, तंत्रज्ञान-जाणकार ग्राहकांची वाढती संख्या, वाढती आकांक्षा आणि विवेकी खरेदीमधील वाढ यामुळे टियर-II शहरांमधील किरकोळ वाढ अजून वधारली आहे. विकासक या शहरांमध्ये मोठ्या आकाराचे समकालीन मॉल्स उभारत आहेत, जे केवळ खरेदीचे ठिकाण म्हणून न पाहता मनोरंजनाचे ठिकाण म्हणून पाहिले जाते. बहुतेक नॉन-मेट्रो शहरे प्रस्थापित व्यापार आणि व्यवसाय केंद्रे आहेत आणि आता बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन आणि स्टार्ट-अप देखील अशा शहरांमध्ये आपली कार्यालये स्थापन करत आहेत.’