नरेंद्र मोदी यांच्या पुतणी दमयंती बेन यांची पर्स चोरणाऱ्या भुरट्यांना अटक; चोरलेले सामान जप्त
Narendra Modi Niece Damyanti Ben (Photo Credits: ANI, File Image)

चोर हा भेदभाव न करणारा व्यक्ती आहे असे मस्करीत बोलले जाणारे वाक्य आपण ऐकून असाल पण दिल्लीतील एका चोराने काल या वाक्याची सार्थ पटवत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुतणीची पर्स चोरण्याचं धाडस दाखवलं. मोदींची पुतणी म्हणजेच दमयंती बेन मोदी (Damyanti Ben Modi) या शनिवारी सकाळी रिक्षातून जात असताना काही बाइकस्वारांनी त्यांच्या हातातली पर्स चोरून पळ काढला. यामध्ये पूर्ण 56 हजार, मोबाईल आणि आवश्यक कागदपत्रे होती. यानंतर लगेचच दमयंती यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली, यावर तातडीने तपास करत आज, (13 ऑक्टोबर) रोजी सकाळी पोलिसांनी संबंधित भुरट्या चोरांना अटक केली आहे. यापैकी एकाचे नाव नोनु असल्याचे समजत आहे. पोलिसांनी या चोरणाकडील सर्व सामान जप्त केले आहे.

दमयंती या मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत, त्या शनिवारी केवळ सहा तासांसाठी दिल्ली मध्ये आल्या होत्या. दिल्ली मधील गुजराती समाज भवन येथे जात असताना त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडला. दमयंती यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार गेट जवळ रिक्षातून उतरत असताना मागून सफेद स्कुटीवरून दोन जण आली व हातातील पर्स खेचून निघून गेली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास करण्यास सुरुवात केली, यातच काही पुरावे शोधून पोलिसांनी आज आरोपींना अटक केली आहे. यातील एक जण हा अल्पवयीन असल्याचे पोलीस प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, या घटनेनंतर दमयंती यांनी दिल्ली पोलीस आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे सुरक्षेसाठी काहीतरी तरतुदी करण्याची मागणी केली आहे, तसेच अशा घटनांपासून स्वतःला वाचवण्यासाठी महिलांनी सुद्धा सक्षम व्हायला हवे असे आवाहन त्यांनी एका मुलाखतीत केले आहे.