ई-कॉमर्स फॅशन कंपनी मिंत्रा (Myntra) ने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका एनजीओ वर्करने (NGO Worker) लोगो (Logo) संदर्भात तक्रार दाखल केली होती. मिंत्राचा लोगो हा महिलांसाठी अपमानजनक आणि आक्षेपार्ह असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. यानंतर मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत महिन्याभराच्या आत लोगो बदलण्यास सांगितले होते.
रिपोर्टनुसार, एनजीओ Avesta Foundation चे नाझ पटेल यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल कडे तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, लोगो आक्षेपार्ह असून तो महिलांसाठी अपमानास्पद आहे. हा मुद्दा त्यांनी अनेक सोशल मीडिया माध्यमातूनही उपस्थित केला. त्यानंतर मुंबई सायबर सेलकडून कंपनीला लोगो ङटवण्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मिंत्रा कडूनही यावर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. वेबसाईट, अॅप आणि सर्व पॅकेजिंग प्रॉडक्टसवर लोगो बदलत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नवीन लोगोसहीत पॅकेजिंग मटेरियल प्रिटिंगच्या ऑडर्स यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
मिंत्रा चा लोगो महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आम्हाला आढळून आले. तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही मिंत्रा कंपनीला एक मेल केला. त्यानंतर त्यांचे अधिकारी आम्हाला भेटायला आले आणि महिन्याभराच्या आत आम्ही लोगो बदलतो असे त्यांनी सांगितले, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे डिसीपी रश्मी करंदीकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.