Mamata Banerjee Delhi Visit: ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौरा; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांशी मिशन  2024 बाबत चर्चेची शक्यता
Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणूक 2021 मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पहिल्यांदाच दिल्लीला येत आहेत. सूत्रांनी माहिती देताना म्हटले की, येत्या 25 जुलै रोजी ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर येतील. या वेळी त्या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतील. याशिवाय राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यास अनेक विरोधी पक्षांशीही चर्चा करतील. या चर्चेवेळी लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊन या भेटीगाठी होण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पश्चिम बंगाल राज्यात सत्ता मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षने जंग जंग पछाडले होते. तरीही भाजपसारख्या सर्व प्रकारची प्रचंड ताकद असलेल्या राजकीय पक्षासमोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आक्रमक प्रचारशैलीसमोर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. विद्यमान राजकीय स्थिती आणि देशातील एकूण वातावरण पाहता या विजयाला ऐतिहासीक महत्त्व आहे. त्यामुळे ममता यांच्या दिल्ली दौऱ्यालाही विशेष महत्त्व येणार यात काहीच विशेष नाही. (हेही वाचा, Punjab Congress Crisis: अमरिंदर सिंह मुख्यमंत्री, नवजोत सिंह सिद्धू प्रदेशाध्यक्ष; पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटण्याची चिन्हे- सूत्र)

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे प्रमुख- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतरही अनेक नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर येऊ शकतात.

दरम्यान, 2024 डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी मोर्चेबांधणी करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये दोन वेळा भेट झाली. त्यानंतर किशोर यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी याही उपस्थित होत्या. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी आतापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.