Jharkhand: धक्कादायक! 65 वर्षीय वृद्धाचे तोंड शिवून, हातपाय बांधून रेल्वे रुळावर फेकून दिले; पत्नी व मुलाचे कृत्य असल्याचा आरोप

त्यानंतर भोलाराम यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उंटारी रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी शिवकुमार यांनी ही घटना म्हणजे मुद्दाम रचलेला कट असल्याचे म्हटले आहे

Railway Line | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

झारखंडच्या (Jharkhand) पलामू (Palamu) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील उंटारी रोड पोलिस स्टेशन परिसरातील भीतिहरवा येथे एका 65 व्यक्तीचे तोंड शिवून त्याला रेल्वे रुळावर फेकून देण्यात आले होते. यावेळी त्याचे हातपाय देखील बांधलेले होते. सुदैवाने त्यावेळी रुळावरून एकही ट्रेन गेली नाही व या व्यक्तीच्या जीव बचावला. सध्या सोशल मिडियावर पीडितेचा फोटो व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे नाव भोलाराम असून, हे कृत्य त्यांची दुसरी पत्नी व सावत्र मुलाने केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भोलाराम यांनी पत्नी सविता, मुलगा आणि अन्य दोघांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. भोलाराम यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून 6 मुले आहेत, तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा आहे. दुसर्‍या पत्नीबरोबर संपत्तीचा वाद सुरु असून याबाबत दोघांमध्ये खटकेही उडाले आहेत. भोलाराम यांनी पोलिसांना सांगितले की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची दुसरी पत्नी सविता देवीने आपल्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा व अन्य दोघांच्या मदतीने भोलाराम यांचे जबरदस्तीने तोंड शिवले व त्यांचे हात पाय बांधून त्यांना रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले.

त्यानंतर पहाटे एका गावकऱ्याने त्यांना पाहिले व गावातील इतर लोकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर भोलाराम यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उंटारी रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी शिवकुमार यांनी ही घटना म्हणजे मुद्दाम रचलेला कट असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भोलाराम यांनी आपल्या दुसर्‍या पत्नीला गोवण्यासाठी हा संपूर्ण कट रचला. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, संपूर्ण घटना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. (हेही वाचा: Bhopal: अंडरगार्मेंट्सची चोरी केली म्हणून दाम्पत्याने 17 वर्षांच्या मुलाला खोलीत डांबले; युवकाने केली आत्महत्या, गुन्हा दाखल)

दरम्यान, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर भोलाराम यांनी 2010 मध्ये दुसरे लग्न केले. भोलाराम यांनी सांगितले की, 6 महिन्यांपूर्वी पत्नीशी वाद झाला होता, तेव्हापासून या दोघांमधील संभाषण बंद आहे. यासंदर्भात गावात पंचायत देखील घेण्यात आली होती, परंतु पत्नी समजून घेण्यास तयार नव्हती.