जनार्दन रेड्डी (संग्रगहित, संपादित प्रतिमा)

तब्बल 600 कोटी रुपयांच्या पोन्जी घोटाळ्यात सईद अहमद फरीद याला जामीन मिळण्यात माजी मंत्री जनार्दन रेडी यांचा हात असू शकतो, असे बंगळुरूच्या सेंट्रल क्राईम ब्रॅंचने सांगितले. त्यानंतर विशेष तपासासाठी पोलीसांची तीन पथके हैदराबादला रवाना झाली. मात्र, या पथकांना हात हालवत परत यावे लागले कारण, जनार्दन रेड्डी हे ही पथके हैदराबादला पोहोचण्यापूर्वीच पसार झाले होते. 600 कोटी रुपयांच्या पोन्जी घोटाळ्यात सहभागी असलेली एक कंपनी आणि तिचे मालक अहमद फरीद यांना ईडीच्या चौकशीतून वाचविण्यासाठी जनार्दन रेड्डी यांनी 18 कोटी रुपयांची डील केली होती. तसेच, ईडीला लाच देण्याचाही प्रयत्न केल्याचा रेड्डी यांच्यावर आरोप आहे.

अंमलबजावणी संचलनालयाने दिलेल्या माहितीनुसार 600 कोटी रुपयांच्या पोन्जी घोटाळ्यात जनार्दन रेड्डी यांचे नाव आले आहे. हे नाव आल्यापासून जनार्दन रेड्डी फरार आहेत. पोलिसांना गुरुवारी माहिती मिळाली होती की, रेड्डी हे बंजारा हिल्स परिसरातील आपल्या एका मित्राच्या अपार्टमेंटमद्ये थांबले आहेत. मात्र, पोलीसांचे पथक जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा रेड्डी तिथून गायब झाले होते. सीबीसी अधिकाऱ्यांनी सांगिले की, रेड्डी हे पोलिसांना मंगळवारपासून चकवा देत आहेत. पोलिसांचे एक पथक लवकरच तेलंगणाला पाठविण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा,पीएनबी घोटाळा: सक्तवसुली संचलनालयाचा नीरव मोदीला दुबईतही धक्का; ५७ कोटी रुपयांच्या ११ मालमत्ता जप्त)

पोलिसांना संशय आहे की, जनार्दन रेड्डी हे हैदराबादमध्येच आहेत. रेड्डी यांचे तिनही मोबाईल नंबर बंद आहेत. नंबर बंद करण्यापूर्वी त्यांनी हैदराबादमधून कर्नाटक सीमेवरील मोबाईल क्रमांकावर काही फोन केले होते. 600 कोटी रुपयांच्या पोन्जी घोटाळ्यात सहभागी असलेली एक कंपनी आणि तिचे मालक अहमद फरीद यांना ईडीच्या चौकशीतून वाचविण्यासाठी जनार्दन रेड्डी यांनी 18 कोटी रुपयांची डील केली होती. तसेच, ईडीला लाच देण्याचाही प्रयत्न केल्याचा रेड्डी यांच्यावर आरोप आहे.