भारतीय रेल्वेचे प्रवाशांना गिफ्ट, लाईव्ह बातम्या आणि मनोरंजनासाठी सुरु करणार हटके ऍप
Indian Railways | Representational Image | (Photo Credit: File Photo)

भारतीय रेल्वेच्या (Indian Railway)  प्रवाशांना येत्या काही दिवसात रेल्वे प्रशासनाकडून एक हटके गिफ्ट मिळणार आहे,ज्यानुसार ,आता रेल्वेची वाट बघताना किंवा प्रवासादरम्यान एका ऍपच्या माध्यमातुन लाईव्ह बातम्या, सिनेमा, टीव्ही शोज, याचा आस्वाद घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ऍप्लिकेशनमध्ये आधीपासूनच संग्रहित केलेले शोज व गाणी असणार आहे. या ऍप्लिकेशनच्या बांधणीसाठी रेल्वे RailTel Corporation of India Ltd या संस्थेसोबत करार करण्याच्या विचारात आहे. तूर्तास मात्र ही सुविधा रेल्वेच्या 1600 स्थानकात उप्लब्ध करून देण्यात येईल तर या वर्षीच्या ऑक्टोबर पर्यंत देशातील 4700 स्थानकात पोहचण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने RailTel कंपनीकडे प्रस्ताव पाठवला असून ऍपच्या निर्मितीची सुरवात करण्यात आल्याची माहिती RailTelचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी दिली आहे.

दरम्यान 2017 मध्ये सुरेश प्रभू यांच्या रेल्वे मंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेक योजनांची घोषणा करण्यात आली होती ज्यात ऑन डिमांड कंटेंट पुरवण्याचा प्रस्ताव देखील करण्यात आला होता. या सुविधेतून रेल्वे प्रवाशांना सोयीसोबतच या ऍपवर कार्यक्रम पाहताना त्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे, रेल्वेला सुद्धा नफा होऊ शकतो.