Coronavirus in India: भारतात आतापर्यंत 5,53,470 कोरोना व्हायरस रुग्ण झाले बरे; देशाचा Recovery Rate 63.02 टक्के
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

भारतामध्ये आज दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार 8,88,944 कोरोना विषाणूचे (Coronavirus) रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 23,333 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, गेल्या 24 तासांमध्ये 18,850 रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे देशात एकूण 5,53,470 रुग्ण बरे झाले आहेत. यासह भारतामधील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) 63.02 टक्के झाला आहे. महत्वाचे म्हणजे देशातील 19 राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. भारत सरकारने याबाबत माहिती दिली. सध्या देशात रुग्णांवर फेवीपिरावीर (Favipiravir) अँटीव्हायरस टॅब्लेटच्या फॅबिफ्लू (FabiFlu) या ब्रँडच्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर प्रयोग होत आहे.

एएनआय ट्वीट -

आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाची 3 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. सर्वाधिक सक्रिय प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील रूग्णालयात 1,05,637 संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्‍या क्रमांकावर दिल्ली, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय प्रकरणे आहेत. सक्रीय प्रकरणात भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच भारत हा चौथा देश आहे, जिथे बहुतांश संक्रमितांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा: कोरोना विषाणूची लस येण्यास उशीर झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर होतील मोठे परिणाम; देशाच्या GDP मध्ये होऊ शकेल 7.5% घट)

कोरोना संक्रमणाच्या संख्येनुसार भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक प्रभावित देश आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलला कोरोना साथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका बसला आहे. परंतु जर दर 10 लाख लोकसंख्येमागे संक्रमित प्रकरणे आणि मृत्यू दर पहिला तर, इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती अधिक चांगली आहे. याशिवाय कोरोना विषाणूच्या रूग्णांच्या ओळखीसाठी देशात कोरोना चाचणी सतत सुरू आहे. रविवारी देशभरात 2.19 लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशातील एकूण कोरोना विषाणूची चाचणी 18 दशलक्षाहून अधिक झाली आहे.