उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूक 22 मार्चला, आजपासून आचारसंहिता लागू
Delhi Assembly Elections 2020 (Photo Credits: ANI)

गोव्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीची तारीख जाहीर झाली असून येत्या 22 मार्चला ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे असे सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयुक्त आर.के.श्रीवास्तव यांनी आज या निवडणूकीची घोषणा केली. 22 मार्च रोजी निवडणुका होणार असून 23 मार्चला याचा निकाल जाहीर करण्यात येईल. पक्षीय पातळीवर होणा-या निवडणुका मतपत्रिकेद्वारे या निवडणूका घेतल्या जाणार आहेत.

या आधी या निवडणूका 15 मार्च घेण्याचे नियोजिले होते. मात्र त्या दरम्यान शिमगोत्सव आल्या कारणाने या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता जिल्हा पंचायत निवडणुका 22 मार्चला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

22 मार्चला 1237 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होईल. 23 मार्चला ही मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. इच्छुक उमेदवार 5 मार्चपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरू शकतात. 6 मार्च रोजी या उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. 7 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

उत्तर गोव्यात 4,18,225 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात 2, 04, 230 पुरुष तर 2, 13,995 महिलांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात 642 बुथांवर मतदान होणार आहे. दक्षिण गोव्यात एकूण 4,11,651 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्यात 2,41,000 पुरुष तर 2,11,610 महिला मतदारांचा समावेश आहे.

ही निवडणूक पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांची देखील विशेष टीम तैनात करण्यात येणार आहे.