Go First Flights: गो फर्स्टची उड्डाणे 16 जूनपर्यंत रद्द; प्रवाशांना मिळणार पूर्ण परतावा, जाणून घ्या सविस्तर

नागरी विमान वाहतूक नियामक DGCA ने एअरलाईनला 30 दिवसांच्या कालावधीत सर्वसमावेशक पुनर्रचना किंवा पुनरुज्जीवन योजना सादर करण्याचा सल्ला दिला होता.

Go First Airline (PC - ANI)

संकटाचा सामना करत असलेली एअरलाइन कंपनी गो फर्स्टने (GoFirst) ने 16 जूनपर्यंत आपले फ्लाइट ऑपरेशन्स रद्द केले आहे. येत्या 16 जूनपर्यंत कंपनीच्या विमानांचे उड्डाण होणार नाही. अशाप्रकारे उड्डाण सेवा अचानक विस्कळीत झाल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली असून, झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. रद्द करण्यात येणाऱ्या विमानांबद्दल प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल, असे एअरलाइनने सांगितले. यापूर्वी गो फर्स्टने 12 जूनपर्यंत उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली होती, आता यामध्ये 16 जूनपर्यंत वाढ केली आहे.

गो फर्स्टने एका प्रेस नोटमध्ये आपल्या ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, या काळात आवश्यक ती सर्व मदत देण्यास ते पूर्णपणे वचनबद्ध आहेत. परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर सामान्य ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात, कंपनीने त्वरित निराकरण आणि ऑपरेशनचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. (हेही वाचा: Air India: महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिल्याने एअर इंडियाचा पायलट अडचणीत, वर्षातील दुसरी घटना)

एअरलाइन कंपनीने सांगितले की, या काळात प्रभावित प्रवासी कोणत्याही मदतीसाठी 1800 2100 999 वर त्यांच्या कस्टमर केअर सेंटरशी संपर्क साधू शकतात, तसेच feedback@flygofirst.com वर ईमेल पाठवून अभिप्रायही देऊ शकतात.

एअरलाइन ऑपरेटरने मे महिन्याच्या सुरुवातीला ऐच्छिक दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता आणि तेव्हापासून त्यांचे कामकाज विस्कळीत होते. नागरी विमान वाहतूक नियामक DGCA ने एअरलाईनला 30 दिवसांच्या कालावधीत सर्वसमावेशक पुनर्रचना किंवा पुनरुज्जीवन योजना सादर करण्याचा सल्ला दिला होता. गो फर्स्टद्वारे सादर केलेल्या पुनरुज्जीवन योजनेचे नियामक पुढील योग्य कारवाईसाठी पुनरावलोकन करेल. गो फर्स्टने गेल्या महिन्यातही अनेक विमाने रद्द केली होती.