देशात सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) डेल्टा प्लस (Delta Plus) या नव्या वेरिएंटमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात आता डेल्टा प्लस वेरिएंटमुळे देशात पहिला बळी गेला आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील उज्जैन (Ujjain) येथे कोविड-19 डेल्टा प्लस वेरिएंटने बाधित महिलेचा 23 मे रोजी मृत्यू झाला होता. काल त्यांना डेल्टा प्लस वेरिएंटची लागण झाल्याचे निश्चित झाले. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस वेरिएंटचे आतापर्यंत एकूण 5 रुग्ण आढळून आले आहेत.
मध्य प्रदेश मध्ये आढळलेल्या 5 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 4 जण पूर्णपणे बरी झाली आहेत. मृत्यू झालेल्या महिलेने कोविड-19 लस घेतली नव्हती. मे महिन्यात या महिलेचे नमूने genome sequencing घेण्यात आले होते. विशेष म्हणजे कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिलेच्या पतीला देखील कोरोनाची लागण झाली होती.
राज्यात डेल्टा प्लस वेरिएंटचे 5 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य योजना आखत असल्याचे मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. डेल्टा प्लस वेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग करण्यात आले असून त्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. (महाराष्ट्रासह 'या' 3 राज्यांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचा धोका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सावध राहण्याचा इशारा)
दरम्यान, भारतात आतापर्यंत डेल्टा प्लस वेरिएंटचे एकूण 40 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 21, केरळ आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 3, कर्नाटकमध्ये 2, पंजाब, आंध्र प्रदेश आणि जम्मू मध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. कोविड-19 च्या डेल्टा स्ट्रेन किंवा B.1.617.2 सर्वप्रथम भारतात आढळून आला. डेल्टा वेरिएंटचे म्युटेशन म्हणजे डेल्टा प्लस वेरिएंट. या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.