केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली (Dadra and Nagar Haveli) एका व्यक्तीने 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला जेव्हा मुलीने विरोध केला तेव्हा नराधमाने या चार वर्षांच्या मुलीचा गळा कापून तिची हत्या केली आणि एका पोत्यात तिचा मृतदेह भरून टॉयलेटला लागून असलेल्या अरुंद जागेत फेकून दिला. शनिवारी पोलिसांनी ही माहिती दिली, तसेच आरोपीला अटक केले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र हा आघात सहन न झाल्याने पीडितेच्या वडिलांनी शनिवारी घटनेच्या एक दिवसानंतर जंतुनाशक सेवन करून आत्महत्या केली.
डीएनएच पोलिस अधीक्षक हरेश्वर स्वामी यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी आरोपी संतोष रजतने नरोली गावात आपल्या घराबाहेर खेळत असलेल्या मुलीला आमिष दाखवून घरी बोलावले. रजतने मुलीला त्याच्या अपार्टमेंटमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा मुलीने ओरडण्यास सुरूवात केली तेव्हा त्याने तिचा गळा धारदार शस्त्राने कापला. नंतर तिचे शरीर एका पोत्यात भरले आणि खिडकी फोडून फ्लॅटच्या शौचालयाला जोडलेल्या अरुंद शाफ्टमध्ये फेकले. दरम्यान, पीडितेच्या कुटूंबाने नरोली पोलिस ठाण्यात आपली मुलगी हरवली असल्याची तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आणि मुलगी राहत असलेल्या निवासी इमारतीतील सुमारे 40 फ्लॅट्स स्कॅन केले. सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना रजतच्या अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळले. तसेच शौचालयाला लागून असलेल्या शाफ्टमध्ये मृतदेह असलेले पोतेही आढळले. चौकशीदरम्यान रजतने आपल्या फ्लॅटवर मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. (हेही वाचा: Rajasthan: जोधपूरमध्ये टूरिस्ट बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू)
मात्र मुलीच्या वडिलांसाठी हा आघात इतका मोठा होता की, त्यांनी मुलीचा मृतदेह पाहून जंतुनाशक खाल्ले. शनिवारी सकाळी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित केले. झारखंडच्या धनबाद येथील रहिवासी असलेला आरोपी गेल्या चार वर्षांपासून दादरा आणि नगर हवेली येथे राहात होता.